Chaundi Ahilyanagar Maharashtra Cabinet Meeting: राज्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सरकारने चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली होती. या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या सृष्टी निर्माणसाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
राज्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी ५५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवींचे जीवन आणि कार्याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून सिनेमा तयार करण्यात येणार आहे. तो केवळ जीवनपट नसेल तर त्यामध्ये त्यांच्या कार्याची प्रभावीपणे मांडणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशी घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र केवळ अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार अहिल्यानगरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या नावाचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात खास मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय स्थापन करण्यात येणार आहे. यासोबतच महिला सक्षम करणासाठी आदिशक्ती अभियान देखील राबवण्यात येणार आहे. शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे हा अभियानाच्या मागचा उद्देश असेल. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आदिशक्ती महिला पुरस्कार देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.