शासकीय नियमानुसार पेसा (आदिवासी) क्षेत्रात तीन वर्षे काम केल्यानंतर संबंधित कर्मचारी विनंती बदलीस पात्र होतो. नगर जिल्हा परिषदेतील आठ परिचर गटातील कर्मचारी गेल्या सात ते आठ वर्षांपासून पेसा क्षेत्रात कार्यरत आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी पेसातून इच्छित स्थळी बदली करण्यासाठी अनेकदा प्रशासनाला विनंती केली. मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. मागील वर्षी त्यांनी बदलीची मागणी केली होती. परंतु मागील वर्षी प्रशासनाने परिचरांच्या बदल्या केल्या नाहीत. परिचरांच्या बदल्यांचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. नियमानुसार वर्षभर ते कधीही या परिचरांच्या बदल्या करू शकतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात आपली बदली होईल, या आशेवर हे कर्मचारी होते. परंतु वर्षभरात बदली झाली नाही. त्यानंतर यंदाच्या बदली प्रक्रियेत दि. २८ जुलै रोजी परिचरांच्या बदल्यांचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु त्यापूर्वीच म्हणजे २७ जुलै रोजी सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून परिचरांच्या बदल्या यंदाही होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे बदलीपात्र परिचर कर्मचाऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला.
शिवाजी देठे, स्वप्निल राक्षे, सचिन पारखे, संदीप देवरे, राजेंद्र लिपणे, अतुल सातपुते, साबळे आदींनी नियमानुसार आपण पेसातून बदलीस पात्र असूनही बदली होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
--------------------
मी माजी सैनिक असून २०१४ पासून पेसा क्षेत्रात परिचर म्हणून कार्यरत आहे. सैन्यदलात असताना १६ वर्षे कुटुंबापासून दूर होतो. आताही सात वर्षे होऊनही आपली बदली झालेली नाही. आई अपंग असून तातडीने आपली बदली व्हावी, अशी विनंती जिल्हा परिषद प्रशासनाला केलेली आहे.
- शिवाजी देठे, परिचर
------------------
यंदाच्या बदल्या प्रक्रियेमध्ये परिचरांच्या बदल्या ठेवल्या होत्या. परंतु परिचर गटातील बदल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या अधिकारात वर्षभर कधीही करू शकतात. त्यामुळे त्या या प्रक्रियेत रद्द केल्या.
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन
----------------
पेसा क्षेत्रात ज्या कर्मचाऱ्यांनी तीन वर्षे पूर्ण केले असे कर्मचारी विनंती बदलीस पात्र असतात. त्यांची इच्छित स्थळी बदली केली जाते. सद्यस्थितीत अशा बदलीसाठी कोणताही अर्ज नाही. असेल तर वर्षभरात कधीही बदल्या करता येतात.
- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद