अकोले : शहरातील मध्यवस्तीतील बाजार तळ, ग्रामीण रुग्णालय, सर्वोदय भागात शुक्रवारी सकाळी शेकडो कावळे, काही कुत्रे, मांजर व डुक्करे अचानक मरून पडले. कावळे मरून पडण्याचा हा सिलसिला सायंकाळपर्यंत सुरू होता. पक्षी-पशू मृत्यूचे गूढ सायंकाळपर्यंत उकलले नव्हते़ पक्षीप्रेमी नागरिकांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.बाजारतळ परिसरात महाकाय वृक्षांचा झाडोरा आहे. येथे बहुसंख्य कावळे व इतर पक्षांची घरटी आहे. शुक्रवारी सकाळी अचानक झाडावरून कावळे टपटपा मरून पडत होती. बाजारतळावर सकाळी जवळपास ५० कावळे मरून पडलेले नागरिकांना दिसले, हा काय प्रकार? या प्रश्नाची उकल अद्याप झालेली नाही. काही कुत्रे देखील मृत अवस्थेत सापडली. या प्रकाराने शहरात घबराहटीबरोबर कावळ्यांची काव काव का थंडावली याची चर्चा सुरू होती. तर्कवितर्क काढले जात असून, कावळे मरण्याचे नेमके कारण नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांपुढे आणावेत, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दिवसभर कावळे मरून पडण्याचे सत्र सुरू होते. सायंकाळी सहा वाजता बाजारतळाच्या प्रवेशद्वाराजवळील झाडावरूनही कावळे मरून पडले होते. कावळ्यांच्या मृत्यूचे गूढ कायम असून, कावळ्यांना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.(तालुका प्रतिनिधी)
अकोलेत असंख्य कावळ्यांचा मृत्यू
By admin | Updated: November 5, 2016 00:48 IST