६ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातून पत्रकार रोहिदास दातीर यांचे स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी अपहरण केले होते. त्याचदिवशी रात्री १०.३० वाजेदरम्यान शहरातील रोटरी ब्लड बँकेजवळील मोकळ्या प्लाॅटमध्ये रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळून आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके नेमली. ८ एप्रिल रोजी सायंकाळी या घटनेतील आरोपी लाल्या ऊर्फ अर्जुन विक्रम माळी (वय २५, रा. जुने बसस्थानक, एकलव्य वसाहत) याला तालुक्यातील शेरी चिखलठाण येथून ताब्यात घेतले. ९ एप्रिल रोजी दुसरा आरोपी तौफिक मुक्तार शेख (वय २१, राहणार राहुरी फॅक्टरी) हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राहुरी पोलिसांच्या पथकाने तौफिक याच्या विंचूर येथून मुसक्या आवळल्या. मुख्य सूत्रधार कान्हू गंगाराम मोरे व अक्षय कुलथे हे दोन आरोपी अद्याप पसार आहेत.
दातीर यांची १८ एकरच्या प्लॉटवरून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:20 IST