अकोले : कळस बुद्रूक शिवारातील निमगाव रोडवरील दत्तात्रय रामनाथ वाकचौरे यांच्या वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यातील दोघा संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी तयार केली आहेत. दरोड्याच्या तपासाने वेग घेतला असून, पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे़ लवकरच गुन्ह्याचा छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे़ तिघा भावांना मारहाण करुन सुमारे २५ तोळे सोन्याच्या दागिण्यांसह ४ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेवून अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी पोबारा केला. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांनी कळस परिसरासह तालुक्यातील संशयितांची चौकशी केली. फिर्यादींनी केलेल्या वर्णनावरुन दोघा आरोपींची रेखाचित्रे पोलिसांनी तयार केली आहेत़ लवकरच दरोड्याचा तपास लागेल, असा विश्वास पोलीस निरीक्षक नारायण वाखारे यांनी व्यक्त केला. विभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे दोन दिवसांपासून अकोलेत असून सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, गुरुवारी अकोले बाजारात फिरणाऱ्या एका संशयितास व शुक्रवारी लेंडीनाका भागात संशयितपणे फिरणाऱ्या तीन-चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (तालुका प्रतिनिधी)
दरोड्यातील दोघांची रेखाचित्रे तयार
By admin | Updated: December 18, 2015 23:15 IST