लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : येथील नगरपालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील १२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी येथे उत्तम सुविधा पुरवत आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केले. पालिका कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचा गुरुवारी नगराध्यक्ष आदिक यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला, यावेळी त्या बोलत होत्या. मुख्याधिकारी गणेश शिंदे, वैद्यकीय अधिकारी सचिन पर्हे, डॉ. संकेत मुंदडा यावेळी उपस्थित होते.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची चांगली काळजी घेतली. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मात्र, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा. पालिका सेवेसाठी सज्ज आहे. मात्र, प्रत्येक नागरिकाने परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन आदिक यांनी केले. कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत असल्यास तातडीने कोरोना चाचणी करावी, घरी थांबून राहू नये. ग्रामीण रुग्णालय अथवा पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
---------