- मच्छिंद्र देशमुखकोतूळ (जि. अहमदनगर) : सध्याचा यात्रा-उत्सवांचा हंगाम असल्याने तमाशा फडमालकांनी राज्यभरातील प्रमुख ठिकाणी सुपारी मिळविण्यासाठी थाटलेल्या राहुट्यांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे. गावोगावचे यात्रा-उत्सव रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवरउपासमारीची वेळ अली आली. सुपारी घेताना घेतलेली उचल कुठून परत द्यायची? लाखो रुपयांचे कर्ज घेऊन उभारलेला फड जगवायचा कसा? अशा प्रश्नांनी फडमालक चिंताग्रस्त आहे.कोरोनामुळे राज्यातील २५० नोंदणीकृत तमाशे प्रशासनाने बंद केले आहेत. महिनाभर आधी आरक्षित झालेल्या तारखा रद्द झाल्या आहेत. पुढील तारखाही आता मिळणे बंद झाले आहे. तमाशा मालक व कलावंत आणि त्यांचे कुटुंब अशा राज्यभरात दीड लाख लोकांची उपासमारी सुरु आहे. फडमालक कर्जबाजारी तर कलावंत उपाशी अशी अवस्था झाल्याने ‘कशी कोरोनाने थट्टा आज मांडली...’ असे म्हणण्याची वेळ तमाशा कलावंतावर आली आहे.राज्यात २५० नोंदणीकृत तमाशांपैकी ३० तमाशे तंबूतील म्हणजे मोठ्या यात्रेला तिकिटावर खेळ करणारे आहेत. या फडामध्ये महिला, पुरूष असे ५० कलावंत व ६० ते ७० तांत्रिक, रोजंदार असतात. होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा तमाशाचा ६० दिवसांचा हंगाम असतो. परंतु आता यात्राच बंद झाल्याने या सर्वांच्या पोटावर पाय आला आहे.फडानुसार २५ हजार ते ३ लाखापर्यंत बिदागी एका खेळासाठी दिली जाते. फडमालक एका कलाकारास ८० ते ९० हजार तर जोडप्यांना दीड लाख रुपये जुलै महिन्यातच उचल देतात. यासाठी फडमालक तमाशाची मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढतात. १०० लोक असलेल्या तमाशासाठी दरवर्षी ५० ते ६० लाखांचे कर्ज घेतले जाते. तमाशा फडाचा दररोजचा खर्च ४० ते ६० हजार रुपये आहे. परंतु आता हंगामाच हातचा जाणार असल्याने हा डोलारा सावरायचा तरी कसा, याचीच चिंता फडमालकांना लागून राहिली आहे.आम्ही कर्ज काढून कलावंतांना उचली दिल्या आहेत. या महिन्यात२५ दिवस तमाशा बंद असल्याने हा हंगमाच तमाशाविना राहणार आहे. सव्वाशे माणसांना दररोज ६० ते ६५ हजार खर्च येतो. कर्ज आणि खर्च दुप्पट होणार आहे. शासनाने या आपत्तीकाळात मदत करावी.- मोहितकुमार नारायणगावकर, तमाशा मालक,विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळ
Coronavirus : यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतांवर संक्रांत! २५० पार्ट्या पडल्या बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 05:50 IST