अळकुटी (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे येथे कोरोना चाचणी करण्यास आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाला पाहून अनेक नागरिक डोंगराकडे पळाले. मात्र, आराेग्य विभागाच्या पथकाने नागरिकांना डोंगरावर पकडून कोरोना चाचणी केली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे याही उपस्थित होत्या. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला.
पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रविवारी (दि. २५) एकाच दिवशी २१० व्यक्तिंना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. गावात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. तेथे तातडीने तहसीलदार ज्योती देवरे या आरोग्य विभागाच्या पथकासह गावांमध्ये भेटी देत आहेत. तेथे नागरिकांना आरोग्य तपासणी करण्यासाठी आवाहन केले जाते. रविवारी बाभूळवाडे गावात २० जण कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे सोमवारी बाभूळवाडे येथील ठाकर वस्तीवरील संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गेले होते. यावेळी काहींनी तपासणीसाठी नकार देत डोंगराच्या दिशेने पळ काढला. यावेळी पथकानेही रुग्णांचा पाठलाग केला. त्यांना डोंगरावरच पकडून त्यांची कोरोना चाचणी केली. डाेंगरावर पळून जाणाऱ्यांमध्ये काही जण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह आल्यानंतरही ते उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये भरती होण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्सद्वारे कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे.
बाभूळवाडे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार १४ दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश देवरे यांनी दिले. या वस्तीवरील काही लोक हे कामानिमित्त पाडळी आळे येथे जात आहेत. त्यामुळे यातील व्यक्ती बाधित असल्यास त्या ठिकाणीदेखील कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
----
नागरिकांचे सहकार्य हवे...
कोरोनाची लक्षणे असतील तर वेळीच तपासणी केल्याने त्वरित उपचार घेता येतील, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.
----
२६ बाभूळवाडे
बाभूळवाडे येथे नागरिकांना डोंगरावर पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, वैद्यकीय पथक.