अहमदनगर : राज्य सरकारच्या सर्वच खात्यांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. पंधरा दिवसांचे अधिवेशन घेतले, तर हा सर्व भ्रष्टाचार उघड होईल, या भीतीनेच राज्य सरकारने दोन दिवसांत पावसाळी अधिवेशन गुंडाळले. हे भ्रष्टाचारी सरकारची तीन चाकी ऑटोरिक्षा २०२४ च्या निवडणुकीत जनताच पंक्चर करेल, असे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपच्या युवा वॉरिअर्स योजनेच्या प्रचार कार्यक्रमासाठी बावनकुळे रविवारी अहमदनगरमध्ये होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केवळ एका जलसंधारण खात्यात नव्हे, तर सर्वच खात्यांत भ्रष्टाचार आहे. कोरोनाचे कारण सांगत अधिवेशन गुंडाळण्यात आले. राज्यात अनेक प्रश्न भेडसावत असताना ते अधिवेशनात मांडू द्यायचे नाहीत, असेच आघाडी सरकारने ठरवले होते. भाजपच्या काळात झालेल्या योजनांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरडाओरडा करीत जुनी कामे थांबवायची आणि त्या योजनेतील निधी इतरत्र वळवायचा, अशा पद्धतीने सरकारचा कारभार सुरू आहे. जलयुक्तच्या कामात भ्रष्टाचार असेल, तर त्यांनी त्यांचे अधिकार वापरून कारवाई करावी. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. नोकऱ्या नाहीत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यातील युवक नाराज आहे. सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी नाराज आहेत. ऑनलाइन शाळा असूनही शंभर टक्के फी घेतली जात आहे. ९० टक्के शैक्षणिक संस्था काँग्रेस-राष्ट्रवादीतच्या नेत्यांच्या आहेत, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. वीज बिलाच्या वसुलीमुळे शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापण्याचा या सरकारला अधिकार नाही. पीककर्ज योजना बंद पडली आहे. कोकणात सुलतानी आपत्तीच जास्त आहे. योग्य नियोजन नसल्यानेच तिथे महापूर आला. खावटी योजना बंद आहे, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. मराठा आणि ओबीसी आरक्षण सरकारला टिकवता आले नाही. ओबीसींचा इम्पिकरल डाटा सरकारने तीन महिन्यांत दिला नाही, तर एकाही मंत्र्यांच्या गाड्या त्यांच्या घरी जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारमधील मंत्री पोपटासारखे बोलत असून, ते अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडून मोकळे होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यातरी त्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही.
--
आम्हाला सरकार पाडायचे नाही
अनैसर्गिक पद्धतीने सरकार स्थापन झालेले आहे, ते सरकार आम्ही पाडण्याची आवश्यकता नाही. ते नैसर्गिक नियमाने आपोआप जाईल. २०२४ च्या निवडणुकीत सरकारची तीनचाकी रिक्षा आपोआप पंक्चर होईल. हे काम आता जनताच करणार आहे. दोन वर्षांत एकही चांगले काम या सरकारने केले नसल्याने या तीनचाकी रिक्षाचे स्क्रॅप विकण्यासाठीही शिल्लक राहणार नाही, असा घणाघात बावकुळे यांनी केला.