कोपरगाव : अवजड वाहतुकीमुळे रस्त्याला पडलेले खड्डे हे माती, मुरमाचा वापर करून न बुजविता डांबर-खडीचाच वापर करून दुरुस्त करण्याचे आदेश बांधकाम विभागाने दिले. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम कोपरगाव उपविभागाचे सहायक अभियंता प्रशांत वाकचौरे यांनी समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला बुधवारी (दि.१६) नोटीस काढून आदेश दिले.
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी अवजड वाहतुकीमुळे कोपरगाव - श्रीरामपूर राज्य मार्ग ३६ वर पडलेले खड्डे हे मुरूम, मातीच्या साह्याने बुजविण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने बुधवारच्या ( दि.१६ ) अंकात बातमी प्रकाशित करून हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला व बांधकाम विभाग यावर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचीच दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पत्रव्यवहार केला आहे. तालुक्यातील कोकमठाण परिसरात समृद्धी महामार्गासाठी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या माती, मुरमाची कोपरगाव - श्रीरामपूर या राज्य मार्गावरून डंपरच्या साह्याने वाहतूक सुरू आहे. अवजड वाहतुकीमुळे या मार्गाची मोठमोठे खड्डे पडून पूर्णतः वाट लागली आहे. या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने खडीमिश्रित मातीचा वापर केला आहे. त्यामुळे संपूर्ण डांबरी रस्त्यावर खडीच खडी झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच राज्य मार्ग ६५ व प्रजीमा ५ या रस्त्यांचे देखील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले आहेत.
( बातमीत कालच्या बातमीचा फोटो वापरावा)
१६बातमी