अहमदनगर : येथील शहर जिल्हा काँग्रेसने पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातून मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ केली आहे. आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यात महागाईचा भस्मासुराने सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणेच कठीण झाले आहे.
आधीच कोरोनाने लोकांचे जीवन चिंताग्रस्त झालेले असताना लोकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारने इंधनाची दरवाढ केल्यामुळे सामान्य लोकांचे जीवन जगणे अधिकच कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा आणि या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष किरण काळे यांनी शहरातून मोर्चा काढला. या मोर्चामध्ये काळे यांनी मोटारसायकल किंवा इतर वाहनांचा वापर करण्याऐवजी घोड्याचा वापर केला. घोड्यावर बसून त्यांनी सरकारचा निषेध केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान या मोर्चाची शहरांमध्ये चांगली चर्चा आहे.