अकोले/राजूर : निळवंडे धरणाच्या व त्याच्या उच्चस्तरीय कालव्यांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही देतानाच निळवंडे धरणाचे काम पंधरा जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी प्रकल्प विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत मंत्रालयात मंत्री तटकरे यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ पाटील, लाभक्षेत्र विकासच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, अधीक्षक अभियंता एम. एन. पोकळे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, प्रकल्प विभागाचे अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तटकरे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत निळवंडे धरण उच्चस्तरीय कालवे, पिंपळगावखांड धरण यांच्या कामाचा अधिकार्यांकडून आढावा घेतला. निळवंडे धरणाचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास धरण पुन्हा रिकामे ठेवावे लागेल, असा मुद्दा मंत्री पिचड यांनी यावेळी उपस्थित केला़ त्यानंतर या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असे कामाचे नियोजन करा़ याबरोबरच वेळ न घालवता गेटच्या कामालाही गती देण्याबाबतच्या सूचना मंत्री तटकरे यांनी अधिकार्यांना दिल्या. धरणाचे उच्चस्तरीय पाईप बंद कालव्यांच्या कामालाही गती देण्याबाबतही त्यांनी अधिकार्यांना सांगितले. उच्चस्तरीय कालव्यांसाठी निधी उपलब्ध करुन देऊ तसा प्रस्ताव नाशिक विभागाने पाठवावा अशा सूचनाही मंत्री तटकरे यांनी दिल्या. पिंपळगाव खांड धरणाचे काम ३५ हजार घनमीटर झाले असून, त्यात ७५ दलघफू पाणी साठेल तर जून अखेरीपर्यंत या धरणाचे ६० हजार घनमीटर काम होणार असल्याचा अंदाज अधिकार्यांनी वर्तविला. या दोन्ही धरणांसाठी वाळूचा प्रश्न ऐरणीवर असून, त्यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे पिचड यांनी सांगितले. तर धरणाच्या व उच्चस्तरीय कालव्यांसाठी प्रकल्प विभागाने १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून, जलसंपदा विभागाने यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, असे सांगितल्यानंतर जलसंपदामंत्र्यांनी अधिकाधिक निधी देण्याचे मान्य केले.
निळवंडेचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करा
By admin | Updated: February 18, 2023 10:47 IST