अहमदनगर : शहरात दुधाळ प्राणी पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना बंधनकारक आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने शहरातील गायी-म्हशींच्या गोठ्याची माहिती मागविली असून, गोठा मालकांना परवाना दिला जाणार आहे. परवाना न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र पशू अधिनियम २०१२ ची अंमलबजावणी करण्यासाठी कोंडवाडा विभागाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. मनपाचे सावेडी, बुरुडगाव, शहर आणि झेंडीगेट ही चार प्रभाग कार्यालये आहेत. या प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये व्यावसायिक व घरगुती गायी-म्हशींचे गोठे आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे. गोठा मालकांची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना परवाना घेण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल. गोठा मालकांना महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे. हा परवाना न घेतल्यास मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
नगर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमदार संग्राम जगताप यांनीही गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित करीत आयुक्तांना धारेवर धरले. यापूर्वीही जगताप यांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. सावेडीत साईश्रद्धा संस्थेने मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात बंदिस्त करण्याचे काम घेतले होते; परंंतु या संस्थेनेही काम बंद केले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांकडून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे याबाबत पालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. पालिकेकडे मोकाट जनावरे पकडण्याची कोणतीही यंत्रणा नाही. कोंडवाडा विभागाने साईश्रद्धा संस्थेला पत्र दिले असून, या संस्थेकडून प्रतिसाद न मिळाल्यास नव्याने निविदा मागिवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
.....
काय आहे नियम
महाराष्ट्र पशू अधिनियम २०१२ नुसार महापालिका हद्दीत दुधाळ जनावरे पाळण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. मालकांनी परवाना न घेतल्यास गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाकडूनच ३ महिने कारवासाची शिक्षा सुनावली जाते, तसेच दंडही आकारण्याची कायद्यात तरतूद आहे.
....
शहरात २ हजार ५०० गायी-म्हशी
सन २०१२ च्या पशू गणनेनुसार शहरातील गायी-म्हशींची संख्या २ हजार ५०० इतकी आहे. ही गणना होऊन बराच काळ लोटला आहे. या काळात ही संख्या आणखी वाढली असावी. त्यामुळे महापालिकेने प्रभागनिहाय माहिती मागविली आहे.
...
- महापालिकेने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठ पशू अधिनियम २०१२ ची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील दूध देणाऱ्या प्राण्यांची संख्या व गोठ्यांची माहिती मागविली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना परवाना घेण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल. परवाना न घेतल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.