कोपरगाव : राज्य शासनाच्या निर्णयानुसार १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. या गर्दीतून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील १४ प्रभागात खासगी डॉक्टरांची नियुक्ती करून बूथनिहाय लसीकरण करावे, अशी मागणी कोपरगाव नगर परिषदेचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांना गुरुवारी (दि.६) निवेदन देत मागणी केली आहे.
कदम म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणामध्ये लसीचा तुटवडा आहे, त्यामुळे १८ ते ४४ व ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांची ग्रामीण रुग्णालयात गर्दी होणार आहे, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे त्यांना सुरक्षित लसीकरणासाठी येणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी बोलावण्यापूर्वी पूर्वनियोजन होणे गरजेचे आहे, तसेच गर्दी होण्यास प्रतिबंध होणेदेखील गरजेचे आहे.