रविवारी दुपारी चाईल्डलाईनच्या १०९८ हेल्पलाइन क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले की, अर्ध्या तासात आगडगाव येथे बालविवाह होणार आहे. यावेळी चाईल्डलाईनच्या सदस्यांनी तत्काळ याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी पोलीस उपनिरीक्षक जारवाल यांचे पथक घटनास्थळी पाठविले. यावेळी चाईल्डलाईनची टीमही सोबत होती. पथक गावात पोहोचले तेव्हा मंगलाष्टके सुरू होती. पथकाने बालवधूचे समुपदेशन करत तिला धीर दिला. त्यानंतर तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी वधू-वरांच्या पालकांकडून मुलीचा विवाह हा १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तिचा इच्छेनुसार केला जाईल, असे लेखी घेतले. या वेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, सर्जेराव शिरसाठ, चाईल्डलाईनचे समन्वयक प्रवीण कदम, पूजा पोपळघट, ग्रामसेवक गर्जे, सरपंच मच्छिंद्र कराळे यांनी बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न केले.
बालविवाह होत असेल तर संपर्क करा
जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास कोणत्याही नागरिकांनी ग्राम, तालुका, जिल्हा बालसंरक्षण समिती तसेच चाईल्डलाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी केले आहे.