श्रीरामपूर : तालुक्यातील माळवाडगाव येथील किराणा व भुसार मालाचे आडत व्यापारी रमेश मुथ्था व अन्य तीनजणांना जिल्हा न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची सोयाबीन खरेदीप्रकरणी फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिन्यांपासून ते अटकेत होते. न्यायालयाने रमेश रामलाल मुथ्था, गणेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्या आणि आशा गणेश मुथ्था यांना जामिनावर मुक्त केले.
फसवणूकप्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले असून तपास पूर्ण झाला आहे. शेतकऱ्यांची रक्कम वसुलीबाबत वेगळी कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे मुथ्था यांना जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद मुथ्था यांच्या वकिलांनी केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आणि गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याने त्यांचा जामीन नामंजूर करण्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपींच्या वतीने ॲड. आर. पी. सेलोत, ॲड. मयूर गांधी आणि पंकज म्हस्के यांनी काम पाहिले.
---------