अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या वर्ग क आणि ड कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहेत. यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हास्तरावरील कर्मचार्यांच्या बदल्या १७ ते २३ मे दरम्यान होणार आहेत. तर तालुकास्तरावरील कर्मचार्यांच्या बदल्या या २६ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यंदा जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या लांब आहेत. मात्र, १६ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच दुसर्या दिवशीच प्रत्यक्षात समुपदेशनाने बदल्याची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांची तयारी सुरू केली होती. यात विनंती बदली, सेवा ज्येष्ठते नुसार बदलीपात्र कर्मचार्यांची यादी तयार करण्यात येत होती. जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, नर्स यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक संवर्ग मोठा आहे. उर्वरित विभागात बदली पात्र कर्मचार्यांची संख्या कमी असते. गेल्या काही वर्षापासून नगर जिल्हा परिषदेत ऑनलाईन पध्दतीने बदल्या होत आहेत. यंदाही तशीच पध्दत राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा स्तरावरील बदल्या १७ ते २३ मे या पाच दिवसांच्या कालावधीत उरकाव्या लागणार आहेत. तर तालुकास्तरावरील बदल्या २६ ते ३१ मे या कालावधीत पार पडणार आहेत.
बदल्यांचा जीआर आला जिल्हा परिषद: लोकसभेच्या निकालानंतर होणार प्रक्रिया
By admin | Updated: February 2, 2023 17:42 IST