शिर्डी : अर्थसंकल्पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बारा बलुतेदारांसह अडचणीत सापडलेल्या सर्वच समाजघटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प आहे. ‘तिजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्या नुसत्याच घोषणा' अशीच परिस्थिती आहे. त्यातच तीन मंत्री असूनही नगर जिल्ह्याच्या पदरात या अर्थसंकल्पातून काहीही पडले नसल्याची खंत भाजपाचे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आ. विखे पाटील यांनी सरकारने केलेल्या विविध घोषणांवर नाराजी व्यक्त केली. या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची कोणतीही पूर्तता केलेली नाही. दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार होते. परंतु, त्याचा शब्दही अर्थसंकल्पात कुठे नाही. ३ लाख रुपयांवरील कर्जाच्या व्याजाच्या रकमेबाबतही सरकार काही बोलत नाही. त्यामुळे ठाकरे सरकारची कर्जमाफी योजना ही फसवी ठरल्याचे आता स्पष्ट होते. वीज बिलाच्या संदर्भातही सरकार उदासीनच असून, अनुदानाच्या रकमाही शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही दिलासा हे सरकार देवू शकलेले नाही, हे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले असल्याचे आ. विखे म्हणाले.
महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने केवळ घोषणा केल्या आहेत. या योजनांसाठी निधी कुठून आणि कसा आणणार? हे सरकार स्पष्टपणे सांगू शकत नाही. सरकारकडे फक्त कल्पनाशक्ती आहे. मात्र, इच्छाशक्तीचा अभाव आहे, हे यातून दिसून येते. हे सरकार फक्त पर्यटनात गुंतले आहे. गृहखात्यापेक्षा पर्यटन विभागाला जादा निधी दिला जातो, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.
....
नगरचे अनेक प्रकल्प रखडले
नगर जिल्ह्यात असंख्य प्रश्न केवळ निधीअभावी रखडले आहेत. या प्रश्नांना अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, महत्त्वपूर्ण विभागांचे मंत्रिपदं जिल्ह्यात असूनही या अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या हिताची कोणतीही बाब समाविष्ट नाही, याबद्दलही आ. विखे यांनी खंत व्यक्त केली.