अहमदनगर : साधारण वर्षभरापूर्वी गाजलेल्या मातीमिश्रित चिक्की प्रकरणानंतर अंगणवाडीतील बालकांना पुरवण्यात येणारा पूरक पोषण आहार बंद आहे. सध्या अंगणवाडीतील बालकांना नियमित आहारात लापशी आणि विविध प्रकारातील खिचडी पुरवण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ४ हजार २७ बालके तीव्र कमी वजनाची आहेत. त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याची माहिती महिला-बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली. अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण कमी व्हावे, यासाठी गेल्या वर्षी राज्य पातळीवरून राजगिरा चिक्की खरेदी करून ती जिल्ह्यात पाठवण्यात आली होती. ही चिक्की मातीमिश्रित असल्याचे आढळून आल्यावर राज्य पातळीवरून त्यावर टीकेची झोड उठली होती. चिक्कीची अन्न औषध विभागामार्फत प्रयोग शाळेत तपासणी करण्यात आली होती. यासह खासगी प्रयोगशाळेत चिक्कीच्या योग्यतेची तपासणी झाली. यात चिक्कीचे काही नमुने खाण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष समोर आला होता. या चिक्कीची महिला बालकल्याण विभागात राज्य पातळीवरून खरेदी झाली होती. चिक्की प्रकरणामुळे सरकारने पूरक पोषण आहार योजना जवळपास गुंडाळली आहे. वर्षभरात पूरक पोषण आहाराचा पुरवठा झाला नसल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, अंगणवाडीतील बालकांना नियमित पोषण आहार देण्यात येत आहे. यात विविध प्रकारातील खिचडी आणि लापशीचा समावेश आहे. जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची ४ हजार २७ बालके आहेत. सर्वसाधारण श्रेणीत ३ लाख ३ हजार बालके असून मध्यम कमी वजनाच्या २३ हजार ९४७ बालकांचा समावेश आहे. तीव्र कमी वजनाच्या बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यांचे कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे महिला बालकल्याण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
चिक्कीनंतर पूरक पोषण आहाराला ब्रेक
By admin | Updated: May 23, 2016 01:14 IST