संदीप रोडे, अहमदनगर
महापालिका नगर शहराला करत असलेला पाणी पुरवठा स्वच्छ असल्याचा दावा करत असली तरी तो तद्दन खोटारडेपणा आहे. नगर शहरात आजही तीस टक्के दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा अहवाल राज्य प्रयोगशाळेने दिला आहे. महापालिका त्यात सुधारणा करेल याची सुतराम शक्यता नाही. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता असून, नगरकरांनो, स्वत:ची काळजी स्वत:च घ्या असेच म्हणण्याची वेळ आता येवून ठेपली आहे. नगर शहरातील नागरिकांची गरज ८० दशलक्ष लीटर पाण्याची असली तरी महापालिकेच्या यंत्रणेद्वारे मुळा धरणातून ७० दशलक्ष लीटर पाणी उपसा होतो. त्यातील सहा दशलक्ष लीटर पाण्याची गळती होते. प्रत्यक्षात ६४ दशलक्ष लीटर पाणी शहरात वितरीत केले जाते. प्रत्यक्षात पुरवठा होणाऱ्या ६४ दशलक्ष लीटर पाण्यापैकी १९ दशलक्ष लीटर दूषित पाणी शहरात वितरीत होत असल्याचा धक्कादायक अहवाल राज्य प्रयोगशाळेने महापालिकेला दिला आहे. नगर महापालिकेचा सध्याचा कारभार पाहता दूषित पाणी पुरवठा स्वच्छ होईल याची शाश्वती नाही. त्यातच आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नगरकरांनो स्वत:ची काळजी स्वत:च घ्या असेच म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. महापालिकेची यंत्रणाच दूषित नगर शहरात महापालिकेचे चार प्रभाग कार्यालय आहेत.तेथे प्रत्येकी एक कर्मचारी पाणी तपासणीचे नमुने घेण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्यक्षात दोनच कर्मचाऱ्यांवर हे काम भागविले जात आहे. हे कर्मचारी प्रभाग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. पण कागदोपत्री व्यवहार मात्र आरोग्य विभागाच्या नावाने चालतो. हे कर्मचारी त्यांच्या मनाने कुठलेही पाणी नमुने तपासणीसाठी पाठवितात. हे कर्मचारी जागेवरच पाण्याची ‘ओटी’ टेस्ट घेतात. त्यात पाणी दूषित असल्याचे दिसले तर ते पाणी पुरवठा विभाग अथवा संबंधित भागाच्या फिटरला कळवून पाणी स्वच्छ करण्याची सूचना देतात. तो नमुना प्रयोगशाळेत तपासणीला पाठवत नाही. प्रयोगशाळेतून पाणी तपासणीचा आलेला अहवाल हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे व तेथून पाणी पुरवठा, प्रभाग अधिकाऱ्यांना जाणे अपेक्षित आहे. पण हा अहवाल स्वच्छता निरीक्षकांकडे जातो. तेथून तो वितरीत होतो. पाणी तपासणीची महापालिकेची सध्या अस्तित्वात असलेली यंत्रणाच दूषित असल्याचे चौकशीअंती समोर आले. तपासणीचे हे नमुनेही महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. या अहवालाबाबत माहिती नाही. पाणी दूषित असेल तर संबंधित विभागाने त्यात सुधारणा करणे अपेक्षित आहे. पाणी पुरवठा विभागाकडून माहिती घेऊन सुधारणा करण्याच्या सूचना देऊ. शहरात पाणी तपासणीचे नमुने घेण्यास दोघे असले तरी ते पुरेसे आहेत. शहरात रोज व एकाचवेळी सगळीकडे पाणी पुरवठा होत नसल्याने दोघे हे काम सहजपणे करू शकतात. - भालचंद्र बेहेरे (प्रभारी आयुक्त) शहरातील पाणी योजना सुरळीत करण्यासाठी फेज टू योजना कार्यान्वित करण्यावर भर दिला आहे. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत असेल त्या भागातील नगरसेवक, नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, उपाययोजना करुन त्या भागाला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल. नवीन पाणीयोजना सुरु झाल्यानंतर शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल, - संग्राम जगताप महापौर नमुने तपासण्यातही आखडता हात ४ महापालिकेने महिनाभरात लोकसंख्येच्या प्रमाणात ८० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत देणे आवश्यक आहे. पण महापालिकेने जून महिन्यात ६७ पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे दिले. त्यातील २० ठिकाणचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार १० टक्केपेक्षा अधिक पाणी नमुने दूषित आढळले तर तसे महापालिकेला कळविण्यात येते. राज्य शासनालाही त्याचा अहवाल जातो. दूषित पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याचे संबंधित यंत्रणेला कळविले जाते. प्रयोगशाळेच्या जून महिन्यातील अहवालानुसार आकडेमोड करता शहराला होणाऱ्या ६४ दशलक्ष लीटर पाण्यापैकी १९ दशलक्ष लीटर पाणी दूषित असल्याचे स्पष्ट होते. मुख्य स्वच्छता निरीक्षक भलतीकडेच ४शहरात नऊ स्वच्छता निरीक्षक व दोन मुख्य स्वच्छता निरीक्षक आहेत. यातील वाघ हे मुख्य स्वच्छता निरीक्षक असले तरी ते मोटार वाहन विभागाकडे कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दुसरे मुख्य स्वच्छता निरीक्षक सेवानिवृत्त झाले असून स्वच्छता निरीक्षक अन्वर शेख यांच्याकडे मुख्य स्वच्छता निरीक्षकाचा प्रभारी पद्भार देण्यात आला आहे. दूषित पाणी आढळलेल्या भागात स्वच्छता करण्याची सूचना प्रभाग अधिकारी मुख्य स्वच्छता निरीक्षकांना करतात. मुख्य स्वच्छता निरीक्षक हे स्वच्छता निरीक्षकांना सांगतात. पण आजमितीला मुख्य स्वच्छता निरीक्षक भलतेच काम करत असून त्यांची भूमिका स्वच्छता निरीक्षक बजावत असल्याचे समोर आले.