संगमनेर : खासदार राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्याच्या आयोजनासाठी गठीत केलेल्या पक्षाच्या विविध राष्ट्रीय समित्यांवर माजी मंत्री तथा संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.काँग्रेसचे मुख्य सचिव जनार्दन द्विवेदी यांनी या निवडी जाहीर केल्या. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीत ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी, मुकुल वासनिक, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, आमदार बाळासाहेब थोरात, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह, खासदार अहमद पटेल, अशोक गहलोत, शशी थरूर, ज्योतिरादित्य शिंदे, राजीव सातव याच्यासह वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या अध्यक्षतेखालील कृषी, रोजगार व गरिबी निर्मूलन समितीत मिनाक्षी नटराजन, आमदार बाळासाहेब थोरात, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस छाननी समितीच्या अध्यक्षपदी, हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस विधिमंडळ समितीच्या निरीक्षकपदी, महाराष्ट्र विधान भवनाच्या राष्ट्रकुल संसदीय शिष्टमंडळाच्या अध्यक्षपदीही थोरात यांची यापूर्वी निवड करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय समित्यांमधील आमदार थोरात यांच्या निवडीचे राज्यभरातून कौतुक होत आहे.
बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय समित्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 19:53 IST