अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता १४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या जामीन अर्जासंदर्भात न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. वेळेत म्हणणे सादर न झाल्याने सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे.
अटकपूर्व जामिनासाठी बोठे याने अॅड. महेश तवले यांच्या माध्यमातून ७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायातयात अर्ज केला होता. यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. ३० नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली होती.
या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. या हत्याकांडतील मुख्य सूत्रधार बोठे हा फरार असून तो अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. त्याच्या शोधासाठी पाच पोलीस पथके रवाना करण्यात आलेली आहेत.