अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र फरार होता. पोलीस पथके त्याचा चौफेर शोध घेत होते. अखेर त्याला हैद्राबाद येथून अटक झाली. सुपारी देऊन बोठे याने जरे यांची हत्या का केली हे आता समोर येणार आहे. दरम्यान न्यायालयाने बोठे याला फरार घोषित करत 9 एप्रिल पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते.
नेमकं प्रकरण काय?
रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 3 दिवसांमध्ये सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच मुख्य सूत्रधाराचाही शोध घेतला आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं भासवण्यात आलं होतं. परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येचा कट उघड झाला.