आपण अन्नपदार्थ खातो, त्या पदार्थांचे रूपांतर उर्जेत होण्याकरिता इन्सुलीनची गरज असते. शरीरात जठराच्या मागे स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते. त्यात इन्सुलीन तयार करण्यासाठी बीटा पेशी असतात. या पेशी अधिक प्रमाणात नष्ट झाल्यानंतर मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात. लहान मुले अधिक प्रमाणात लघवी करतात. पाणी जास्त प्रमाणात पितात, जेवण जास्त करतात. त्यांना अशक्तपणा जाणवतो. अधिक खाऊन देखील त्यांचे वजन वाढत नाही. अशी मधुमेहाची लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. लक्षणे जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे, कोणतेही आजार अंगावर काढू नयेत.
--------------
लहान मुलांमधील मधुमेह हा आनुवंशिकतेनुसार नसतो. लहान मुलांना मधुमेह होण्याची कारणे वेगळी असतात. स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते त्यात इन्सुलीन तयार करण्यासाठी बीटा पेशी असतात. इन्फेक्शन किंवा अन्य कारणांनी या पेशी कमी होतात. काही मुलांना जन्मताच या पेशी नसतात. इन्सुलीन तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्या कारणाने लहान मुलांना मधुमेह होऊ शकतो.
- डॉ. सुशांत गिते, फिजिशियन, संगमनेर
---------------
मधुमेह झाल्याचे आले समोर
पोट दुखणे, मळमळ-उलट्या होणे, दम लागणे असा त्रास बाळाला होत असल्याने त्याचे आई-वडील काही दिवसांपूर्वी बाळाला दवाखान्यात घेऊन आले होते. कोरोनाची लक्षणे वाटत असल्याने कोरोनाबरोबरच इतरही तपासण्या करून घेतल्या. कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, इतर तपासण्यातून बाळाला मधुमेह झाल्याचे समोर आल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप होन यांनी सांगितले.
------------
लहान मुलांना मधुमेह होईल, असा विचारदेखील कुणी करत नाही. त्यांच्यात ‘इन्सुलीन डिपेन्डन्ट डायबेटीस’ आढळतो. अगदी सहा महिन्यांच्या मुलांना देखील मधुमेह झाल्याचे समोर आले आहे. आमच्या बाळाला अशक्तपणा जाणवतो. जेवण करूनदेखील त्राण राहत नाही. अशी लहान मुलांची समस्या घेऊन त्यांचे पालक येतात. रक्त, लघवी तपासणीतून मधुमेहाचे निदान होऊ शकते.
-डॉ. संदीप होन, बालरोगतज्ज्ञ, संगमनेर
-------------