राहुरी (जि. अहमदनगर) : शेतकऱ्यांचे कष्ट कमी करता येतील, उत्पादन आणि उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी चांगले संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकरी म्हणजेच अन्नदेवतेसाठी असे संशोधन करणे हे पुण्याचे काम आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी यावर्षीपासून उत्तम प्रतिचे कृषी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित आढावा बैठकीत कृषिमंत्री भुसे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विद्यापीठाचे कुलगुरू पी.जी. पाटील, शरद गडाख, विकास पाटील उपस्थित होते.
भुसे म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी कार्य फार मोठे आहे. पण यापुढे नावीण्यपूर्ण संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. कमी खर्चाचे आणि शेतकऱ्यांना शेतीवर वापरता येईल, अशी सूक्ष्म सिंचन पध्दती विकसित होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या बियाण्यावर विश्वास असून त्याची मागणी वाढली आहे. विद्यापीठांनी जास्तीत जास्त बियाण्यांचे उत्पादन वाढवावे. उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाला चालना द्यावी. कमी दरात उच्च प्रतिचे बियाणे शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पिकाच्या उत्पादकतेबरोबर पोषकता वाढण्यासाठी संशोधनात भर द्यावा. नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने समन्वय ठेवावा. परदेशी भाजीपाला व फळ यावर कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे. बाजारपेठेच्या मागणीनुसार वाण विकसित करणे, परदेशी पिकांचा संशोधनात आंतरभाव करणे व त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
..............
रिक्त जागा भरण्यास परवानगी द्या
कुलगुरू पी.जी. पाटील म्हणाले, कृषिमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार कृषी विद्यापीठामध्ये विविध संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. विद्यापीठाच्या संशोधनाला गती देण्यासाठी बंद झालेला विद्यापीठ आकस्मिक निधी पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे. विद्यापीठ मॉडेल ॲक्ट अंमलात आणला तर कृषी विद्यापीठांना सहाय्य होईल. विद्यापीठातील ५० टक्के जागा रिक्त जागा भरण्यास शासन स्तरावर परवानगी मिळावी.
.............
विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी दिले ६५ लाख
कोविड आपत्तीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्यावतीने ६५लाख रुपयांचा धनादेश चार हजारचा धनादेश कुलगुरू पी. जी. पाटील यांचे हस्ते यांचे हस्ते कृषिमंत्र्यांना सुपुर्द करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे संचालक फलोत्पादन कैलास मोते, विशेष कार्य अधिकारी रफिक नायकवाडी, सुधाकर बोराळे उपस्थित होते.
280621\1612-img-20210628-wa0078.jpg
कष्टकरी शेतकर्यांसाठी संशोधन करणे हे पुण्याचे काम
- कृषि मंत्री. दादाजी भुसे