टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील मध्यवर्ती भागातील पोलीस दूरक्षेत्रासमोर असलेले इंडिकॅश बँकेचे एटीएम मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ या एटीएममध्ये ३ लाख ५४ हजार रुपयांची कॅश होती़ मात्र, चोरट्यांना एटीएममधून ही कॅश काढता न आल्यामुळे बँकेचे मोठे नुकसान वाचले़टाकळीभान येथील बसस्टॅण्डसमोरच हे एटीएम आहे़ पोलीस चौकीच्या अगदी जवळच असलेले एटीएम चोरट्यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास फोडले़ चोरट्यांनी हे एटीएम तोडून उलटे करुन त्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला़ या एटीएममध्ये ३ लाख ५४ हजार रुपयांची कॅश होती़ मात्र, चोरट्यांना एटीएममधील कॅश काढण्यात अपयश आले़ त्यामुळे ही रक्कम वाचली़ पण चोरट्यांनी हे एटीएम तोडल्यामुळे बँकेला पुन्हा नवीन एटीएम बसवावे लागणार आहे, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले़ बुधवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी पंचनामा केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़
टाकळीभान येथील एटीएम चोरट्यांनी फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 12:43 IST