अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना तीव्र उन्हामुळे अशक्तपणा आला. त्यामुळे राळेगणसिद्धी येथील निवासस्थानी त्यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना गुरुवारी दुपारी नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितल.उन्हाचा तीव्र त्रास झाल्याने अण्णा हजारे यांना गुरुवारी सकाळी थोडा थकवा आला. त्याचवेळी राळेगणसिद्धी येथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांची प्रकृती साधारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उष्णतेमुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. त्यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला. दक्षता म्हणून हजारे यांना गुरुवारी दुपारी नगर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. बापुसाहेब कांडेकर, डॉ. सुनील बंदिष्टी, डॉ. मनोज मगर यांनी अण्णांच्या विविध तपासण्या केल्या. ‘मला पूर्ण बरे वाटत आहे. थोडासा थकवा जाणवत आहे’, असे खुद्द हजारे यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान नोबल हॉस्पिटल परिसरात जिल्हा विशेष शाखेतर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी अनिल कवडे, सीईओ शैलेश नवाल यांनीही रुग्णालयात येऊन अण्णांच्या प्रकृतीची चौकशी केली.(प्रतिनिधी)
अण्णा हजारे यांना अशक्तपणा
By admin | Updated: April 1, 2016 00:53 IST