अहमदनगर : महापालिकेने प्रभागनिहाय सुरू केलेली लसीकरण तात्पुरती बंद केली असून, शुक्रवारपासून आठ आराेग्य केंद्रांवरच लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी १०० डोस उपलबध करून दिले जाणार आहेत.
महापालिकेने नगरसेवकांच्या मागणीनुसार शहरातील विविध भागात २० नवीन उपकेंद्र सुरू केली होती. या केंद्रांवर लसीकरण करण्यात येत होते. ही केंद्र सुरू केल्याने महापालिकेवर सर्वच स्तरातून टीका झाली. तसेच नगरसेवकांकडून आणखी केंद्र सुरू करण्याची मागणी होत असल्याने लसीकरण केंद्रांची संख्याही वाढली हाेती. त्यामुळे लसीकरणाचा पुरता गोंधळ उडाला होता. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी गुरुवारी सायंकाळी केवळ मनपाच्या आठ उपकेंद्रांवरच लसीकरण करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर केले जाणारे लसीकरण बंद करण्यात आले असून, मनपाच्याच आरोग्य केंद्रातच लसीकरण केले जाणार आहे.
...-
शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवरच लस देण्यात येणार आहे. हा आदेश तात्पुरता असून, शुक्रवारी आरोग्य केंद्रांवरच लसीकरण केले जाईल.
- शंकर गोरे, आयुक्त
...
या केंद्रावर लसीकरण
- महात्मा फुले आरोग्य केंद्र
- तोफखाना आरोग्य केंद्र
- सावेडी आरोग्य केंद्र
- केडगाव आरोग्य केंद्र
- आयुर्वेद आरोग्य केंद्र
- नागापूर आरोग्य केंद्र
- भोसले आखाडा आरोग्य केंद्र
- मुकुंदनगर आरोग्य केंद्र