नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 13:51 IST
नद्यांना पूर : रस्ते जलमय
नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
अहमदनगर : काल मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपासून चागंलाच सुरू झाला. पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जामखेड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत.शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी पहाटेच्या सुमारास वाढला. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत सुरू आहे. संततधार पावसाने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. नगर शहरातील सर्व रस्ते जलमय झाले आहेत. जामखेडमधील विंचरणा नदीला पूर आला असून वाड्यांशी असलेला संपर्क तुटला आहे. पारनेर तालुक्यातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. अनेक भागातील वीजपुरवठा रात्रीपासून खंडित झाला आहे. राहुरी तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली असून मुळा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. मुळा नदीलाही पूर आला आहे. मूग पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. अकोले, भंडारदरा परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली असून आधीच पर्यटकांची गर्दी असलेल्या या भागात पावसामुळे आनंद द्विगुणित झाला आहे. शिर्डीमध्येही रविवार असल्याने दर्शनासाठी गर्दी असून पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली. निघोज (ता. पारनेर) येथील पूल पुरामुळे वाहून गेला आहे.नगर शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. रविवारची सुटी असल्याने नागरिकांनी घरात बसूनच पावसाचा आनंद लुटला. सीना नदीलाही पूर आला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर गुडघ्याइतके पाणी साचले आहे. सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे.