अहमदनगर: खासगी सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी छळल्यानेच उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव रामकृष्ण पवार यांनी आत्महत्या केल्याचे अखेर समोर आले असून, याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत पवार यांची मुलगी अमृता पवार (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केली आहे.खासगी सावकार नवनाथ विठ्ठल वाघ (रा. बुरूडगाव), यशवंत कदम, विनायक रणसिंग, कटारिया जीजी (सर्व रा. नगर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यातील नवनाथ वाघ याला अटक केली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, उद्योग समूहाच्या विकासासाठी पवार यांनी चार खासगी सावकारांकडून पैसे घेतले होते. या पैशाला सावकारांनी १० ते १५ टक्केपर्यंत चक्रवाढ व्याज लावले होते. पवार यांना ओम गार्डन, भुईकाटा, वॉशिंग सेंटर या व्यवसायातून प्रतिदिन साडेतीन लाख रूपये मिळायचे. है पैसे मात्र सावकार पवार यांच्याकडे येऊन दररोज घेऊन जायचे. नवनाथ वाघ हा मागील एक वर्षांपासून पवार यांच्या पेट्रोल पंपावर तर कधी अरणगाव येथील शेतात येऊन त्यांच्याकडून बदनामी करणे व जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दररोज १ ते ३ लाख रूपये घेऊन जायचा. वाघ याच्या त्रासाला पवार कंटाळले होते. यशवंत कदम हाही मागील सहा महिन्यांपासून रात्री-अपरात्री येऊन पवार यांच्याकडून दररोज १ लाख रूपये घेऊन जायचा. कटारिया जीजी हिला महिन्याला २ तर विनायक रणसिंग यालाही काही लाखांत रक्कम द्यावी लागत होती. अशा सर्व सावकारांच्या व्याजाचे मिळून पवार यांना महिन्याला ७५ ते ८० लाख रूपये द्यावे लागत होते. इतर संस्थांच्या कर्जाचे हप्ते व्यवसायातून दैनंदिन मिळणाऱ्या पैशातून देणे शक्य होते. या चार सावकारांसह इतर काही सावकारांनी मात्र व्याजाच्या पैशासाठी मागील एक वर्षांपासून पवार यांना त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्यानेच पवार यांनी ३१ मार्च रोजी आत्महत्या केली.
पोलीस फरार सावकारांच्या शोधात
ओम उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च रोजी स्वत:च्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पवार यांनी एक पत्र लिहून ठेवले होते. या घटनेप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वाघ याला अटक केली असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू केला आहे.