- मच्छिंद्र अनारसे
कर्जत (जि. अहमदनगर ) : जुन्या काळी "बाई माझ्या बकरीचा संमद्यासनी लागलाय लळा" हे गाणं लोकप्रिय झाले होते. त्याप्रमाणे कर्जतमध्ये "बाई माझ्या कुत्रीला लागलाय मांजराचा लळा" असं म्हणायची वेळ आली आहे. मांजर आणि कुत्रा यांचं वैर सर्व श्रुत आहे. मात्र कर्जत शहरात हॉटेल व्यावसायिक छोट्या राऊत यांच्या घरी मांजराचे पिल्लू कुत्रीचे दूध पित आहे. हे दृश्य सर्वत्र कुतूहलाचा विषय बनले आहे.
कर्जतपासून जवळच असलेल्या कर्जत शिंदेवाडी रोडलगत छोट्या राऊत यांचे हॉटेल आहे. येथे कुत्री, तिची पिल्ले आणि मांजर कुटुंबातील सदस्य बनले आहेत. छोट्या राऊत यांचे कर्जत शिंदेवाडी रोड लगत छोटे हॉटेल आहे. तेथे कुत्री आणि मांजर दोघे एकाचवेळी प्रसूत झाले. मांजरीला सहा पिल्ले झाली तर कुत्रीला पाच पिल्ले झाली. मात्र दुर्दैवाने मांजर आणि तिची पाच पिल्ले मरण पावली. मांजराचे एक पिल्लू जिवंत राहिले. या लहान पिल्लाला जगवायचे कसे ? असा प्रश्न छोट्या राऊत यांना पडला होता. कारण ते पिल्लू काही खात नव्हते. मग एक दिवस कुत्रीच्या पिल्लासोबत मांजराच्या पिल्लाला कुत्रीला पाजले. मग हे नित्याचेच झाले.