शेखर पानसरे / योगेश रातडिया
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर / आश्वी : कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करत जगण्या-मरण्याचा संघर्ष सुरू असताना अचानक एका आदिवासी कुटुंबावर जीवघेणा प्रसंग ओढवतो. झोपडीबाहेर झोपलेल्या आईसह तिच्या चार वर्षाच्या मुलाच्या अंगावरून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे वाहन जाते. पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्यांचे कर्तव्य बजावतात. मात्र, या जीवघेण्या प्रसंगातून बचावलेल्या आदिवासी महिलेसह तिच्या बालकाची पैसे नसल्याने उपचार अभावी परवड सुरु आहे.
संगमनेर तालुक्याच्या पूर्वेकडील प्रतापपूर हे गाव. गावच्या शिवारातून अमृतवाहिनी प्रवरा नदी वाहते. नदीपात्रापासून साधारण शंभर-दीडशे फुटावर आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती आहे. ७० ते ८० आदिवासी कुटुंबे येथे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या वस्तीवर राहणाऱ्या एका आदिवासी कुटुंबावर २८ मे च्या पहाटे जीवघेणा प्रसंग ओढावलेला. सुनील सुरेश पवार हे त्यांची पत्नी सुनीता, सात वर्षाची मोठी मुलगी अश्विनी, पाच वर्षाची मुलगी धनश्री व चार वर्षाचा मुलगा दीपक यांच्यासमवेत येथे झोपडीत राहतात. जवळच सुरेश पवार यांचे आई-वडील, दोन भाऊ, भावजय हे देखील राहतात. सुनीता व त्यांचा मुलगा दीपक हे झोपडीबाहेर झाेपले होते. नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत चारचाकी वाहनांमधून वाळू वाहिली जात होती. पहाटे पाचच्या सुमाराला पोलिसांचे वाहन समोर दिसताच चारचाकी वाहनातून अवैधरीत्या वाळू वाहणाऱ्या गोंधळलेल्या चालकाने हे वाहन आदिवासी समाजाच्या वस्तीकडे वळविले. पोलीस कारवाईपासून वाचण्याच्या प्रयत्नात वाहन घराबाहेर झाेपलेल्या महिलेसह तिच्या बालकाच्या अंगावर त्याने घातले. गंभीर जखमी झालेली महिला ‘माझ्या मुलाला वाचवा’ असे ओरडत होती. तिच्या आवाजाने तिची सासू, दीर, भावजय तिच्याकडे धावत आले. नेमके काय झाले कुणाला समजेना, काही वेळाने तिने अंगावरून वाळूचे वाहन गेल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर तिचा दीर वाळूचे वाहन गेलेल्या दिशेने धावला. परंतु वाहन निघून गेले होते.
सुनीता यांच्या कानाला, पायाला गंभीर इजा झाली. कानातून रक्त वाहत होते. दीपकचे पूर्ण तोंड सुजले. त्या दोघांना उपचारासाठी एका रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सुनीता यांच्या कानाला दहा टाके घातले. सुनीता व दीपकला रुग्णालयात दाखल करा, अशी विनंती कुटुंबीयांनी डॉक्टरांना केेली. मात्र, कोरोनाचे कारण देत डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवून दिले.
सुनीता यांच्या कानातून अजूनही रक्त, रक्ताच्या गाठी पडतात, डोके दुखते, ऐकू येत नाही, कानाचा पडदा फाटला. मुलाचे तोंड दुखत असून त्याचे दात हालत आहेत. त्रासाने हे माय-लेक विव्हळत आहेत. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. हातावर कमवायचे आणि हातावर खायचे अशीच परिस्थिती या कुटुंबाची आहे. नशीब बलवत्तर म्हणून या माय-लेकाचा जीव वाचला. मात्र, उपचार मिळत नसल्याने ते अधिकच त्रासलेले आहेत.
-----------------
एकलव्य आदिवासी संघटना करणार मदत
एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, कार्याध्यक्ष विकास डमाळे यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेतली. सुनीता पवार व त्यांचा मुलगा दीपक यांच्यावर योग्य उपचारांसाठी पहिले एमआरआय करावा लागणार आहे. त्यानंतर दुखापत किती गंभीर आहे हे समजेल. या कुटुंबाला एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सामाजिक संघटना वैद्यकीय मदत करणार आहे. असे प्रदेशाध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले.
----------------
घराबाहेर झोपलेल्या आईसह मुलाच्या अंगावर गेलेले वाळूचे वाहन ताब्यात घेतले होते. या वाहनावर वाहन क्रमांक नव्हता. गुन्हा दाखल झालेल्या संबंधित व्यक्तीला नोटीस बजावली आहे. या गुन्ह्यात अटक करता येत नाही. ताब्यात घेतलेले वाळूचे वाहन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ते संबंधित व्यक्तीच्या ताब्यात दिले आहे.
- शिवाजी पवार, सहाय्यक फौजदार, आश्वी पोलीस ठाणे, ता. संगमनेर