कोपरगाव : वनविभागाच्या जमिनीतील ६८ हजार ८२३ रुपये किमतीची ६८ ब्रास वाळूमिश्रित मातीची अवैधरीत्या चोरी करणाऱ्या जेसीबी, सहा ट्रॅक्टरसह सात जणांवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईतील वाहने चालकांसह कोपरगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणत असताना वाहनचालकांनी पथकातील अधिकाऱ्यासह सहकाऱ्यांना दमदाटी करून कारवाई केलेली सर्वच वाहने पळवून नेली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथे रविवारी (दि. २५) दुपारी घडली. याप्रकरणी कोपरगाव वनविभागाचे अधिकारी रामकृष्ण ज्ञानदेव सांगळे यांनी फिर्याद दाखल केली.
अविनाश भाऊसाहेब लबडे (रा. निमगाव, ता. येवला, जि. नाशिक), गणेश बाळासाहेब कदम, सुहास कचरू लामखेडे, गणेश कारभारी लामखेडे, चेतन आबासाहेब लामखेडे, बाळकृष्ण रावजी लामखेडे, कैलास वाल्मीक घायतडकर (रा. रवंदा, ता. कोपरगाव ) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. वनविभागाच्या या कारवाईतील पिवळ्या रंगाचे विनानंबरचे एक जेसीबी मशीन, महिंद्रा ट्रॅक्टर (एमएच १७, १६५७), इंटरनॅशनल कंपनीचा ट्रॅक्टर ( एमएच १६ सी ८३९१ ), पावर टँक कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच १६ ए ४६७६), पांढऱ्या रंगाचा एस्कॉर्ट ट्रॅक्टर (एमएच १७ बीएक्स १६९३), विनानंबरचे एक महिंद्रा व एक जॉन डिअर ट्रॅक्टर ही वाहने पळवून नेली. भादंवि कलम ३७९, १८६, ५०४, ५०६ आणि भारतीय वनअधिनियमाच्या अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.