श्रीगोंदा : ऊस अगर इतर माल वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक, मालकांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशा सुचना श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देणार आहे, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.
लोणी व्यंकनाथ शिवारात नगर-दौंड रस्त्यावर पवारवाडीजवळ उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीचा आणि समोरून येणाऱ्या मालट्रकचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला. त्यात चार मुलांचा बळी गेला. या स्थळाची पाहणी करण्यासाठी जाधव आले होते. यावेळी ते बोलत होते.
जाधव म्हणाले, साखर कारखाने चालू आहेत. पाच-सहा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक श्रीगोंदा तालुक्यातील विविध रस्त्याने होत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टर ट्रॉली व ट्रकला नंबर प्लेट, रिफ्लेक्टर रेडीयम नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या वाहन चालक, मालकांनी रिफ्लेक्टर बसवावेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले. अशी वाहने रस्त्यावर आढळली तर पोलिसांनी कारवाई करावी. कुणाचीही गय करू नये, असेही त्यांनी सांगितले.