अहमदनगर : पाथर्डी येथे दर्गा पुजेच्या वादातून मारहाण करून खून करणाऱ्या एका आरोपीस अजन्म कारावास व दहा हजार रुपयांचा दंड तर दुसऱ्या आरोपीस सहा महिने सश्रम करावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश एम.आर. नातू यांनी शुक्रवारी या खटल्याचा निकाल दिला.
समद सालार सय्यद (वय २३) याला अजन्म करावास, तर त्याचा भाऊ शकूर सालार सय्यद यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांनी २४ जुलै, २०१८ रोजी आयुब उस्मान सय्यद यांना मारहाण करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मयत आयुब यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी.एस. मुंडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड.केदार केसकर यांनी काम पाहिले. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयताची पत्नी व वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष महत्त्वाची ठरली. समोर आलेले साक्षीपुरावे व सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल बी.बी. बांदल व कॉन्स्टेबल पांडुरंग पाटील, नंदकिशोर सांगळे व एस.आय. काशिद यांनी ॲड. केसकर यांना सहकार्य केले.