चांदेकसारे : अज्ञात वाहनाने बैलगाडीला दिलेल्या धडकेत दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १२) पहाटे नाशिक-शिर्डी रस्त्यावरील कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात इनामके वस्तीसमोर घडली.कर्मवीर शंकराव काळे कारखान्याचा ऊस तोडणी कामगार सुरेश महादु राठोड (रा.सांगवी, ता. चाळीसगाव) हा कोळपेवाडीवरून झगडे फाट्याकडे ऊस तोडणी करण्यासाठी मंगळवारी पहाटे बैलगाडी घेऊन जात होता. दरम्यान ५ वाजण्याच्या सुमारास नाशिक-शिर्डी रस्त्यावरील घारी शिवारात इनामके वस्तीसमोर समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने बैलगाडीला जोराची धडक दिली. या अपघातात राठोड यांच्या मालकीचे अंदाजे ७५ हजार रूपये किंमतीचे दोन बैल जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी सुशीला या किरकोळ जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ खासगी दवाखान्यात नेण्यात आले. अपघातानंतर वाहन वेगाने निघून गेले. याप्रकरणी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार अर्जुन बाबर अधिक तपास करीत आहेत.
नाशिक-शिर्डी रस्त्यावर अपघात; दोन बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:32 IST