कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच यशस्वी ८ लाख ११ हजार ६३३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असल्याची माहिती अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०-२१ गळीत हंगामाची अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांच्या उपस्थितीत, संचालक ज्ञानेश्वर परजणे, ललिता परजणे या उभयतांच्या हस्ते शुक्रवारी ( दि. ३० ) साध्या पद्धतीने सांगता झाली. याप्रसंगी कोल्हे बोलत होते. प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे व शेतकी अधिकारी गोरखनाथ शिंदे यांनी गळीत हंगामाविषयी माहिती दिली.
कोल्हे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे असंख्य संघर्षावर मात करीत नवनवीन पायलट प्रकल्प सुरू करून ते यशस्वी केले. थेट उसाच्या रसापासून ८३ लाख लिटर्स इथेनॉल उत्पादन घेतले आहे व राज्यात सर्वाधिक २ लाख ७ हजार ५४० टन रॉ शुगर व ४५ हजार टन पांढरी साखर निर्यातीतही पहिला क्रमांक पटकावला आहे. गळीत हंगामात इतिहासात प्रथमच देशात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याचे धाडस कोल्हे कारखान्याने यशस्वी करून दाखविले आहे.
त्याचबरोबर पॅरासिटामोल या औषध निर्मितीसाठीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळेची निर्मिती करून युवानेते विवेक कोल्हे हे स्वत: लक्ष देऊन अल्पावधीतच प्रकल्प उभारणी करीत आहेत. ऊस उत्पादक सभासद शेतकरी, संचालक मंडळ व व्यवस्थापनांच्या सहकार्याने सहकारी कारखानदारीत जे-जे नवीन तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करीत, जागतिकीकरणाच्या स्पर्धेत कुठेही मागे न राहता दैनंदिन गाळप क्षमता वाढवीत संजीवनीने राज्याला अनेक दिशादर्शक प्रकल्प देत सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.