शेवगाव : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून बुधवार (दि.२३)पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) अठ्ठावीस उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले. दरम्यान, गुरुवारी सेतू केंद्रावर इच्छुकांनी अर्जाबाबत माहिती व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते.
तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या ४०८ जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींमधून तब्बल २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार अर्चना पागिरे यांनी २६ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. कडाक्याच्या थंडीत मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडे एकेका जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीचा संभाव्य धोका ओळखून अद्याप उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणचे उमेदवारही निश्चित झाले आहेत. काही उमेदवारांना ऐनवेळी अर्ज दाखल करण्यासंदर्भात नेत्यांकडून सांगण्यात येण्याची शक्यता आहे.
३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे. ४ ते १४ जानेवारी, अशा ११ दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ जानेवारीला निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.