आश्वी: निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने सोमवारी निमगाव जाळी येथे अडविलेल्या दोन वाहनांमध्ये सुमारे १८ लाख ७५ हजार रूपये सापडले. मात्र हे पैसे निवडणुकीशी संबंधित नसल्याची खात्री पटल्यावर वाहने सोडून देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने मंडळाधिकारी डी. एच. पोटे, कॉन्स्टेबल पांडुरंग कावरे, मच्छिंद्र शिरसाठ, सलिम पठाण यांचे तपासणी पथक नेमले आहे. सोमवारी दुपारी पथकाने लोणीहून संगमनेरच्या दिशेने निघालेली बोलेरो जीप (एम. एच. १२, जे. के. ३४६२) व बजाज अॅपे (एम. एच. १७, ए. जे. ४५६५) ही दोन्ही वाहने निमगाव जाळीत अडवून तपासणी केली. बोलेरोमध्ये १७ लाख, तर अॅपेमध्ये १ लाख ७५ हजार अशी एकूण १८ लाख ७५ हजार रूपयांची रोकड आढळून आली. बोलेरो चालकाकडे विचारणा केल्यावर सदरची रक्कम सेन्ट्रल बँक आॅफ इंडियाच्या संगमनेर शाखेला देण्यासाठी नेली जात असल्याचे समोर आले. तर अॅपेमधील पावणे दोन लाख रूपये हे बाभळेश्वरच्या एका खताच्या व्यापाऱ्याकडून वसुली केलेले संगमनेरच्या कृषी सेवा केंद्राचे असल्याचे समजले. सदर रकमेचा निवडणुकीशी संबंध नसल्याची खात्री पटल्यावर दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. (वार्ताहर)
दोन वाहनांत १९ लाख सापडले
By admin | Updated: September 30, 2014 01:29 IST