संदीप रोडे, श्रीरामपूरचोरी केलेल्या मालमोटारींची बनावट कागदपत्रे तयार करून श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झाल्याची माहिती हाती आली असून त्याची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशीच बनावट नोंदणी नाशिक, जळगाव व औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. चोरी केलेल्या तब्बल १८ मालमोटारीची नोंदणी श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाल्याचा प्रकार समोर येऊ पाहत आहे. शोरुमची बनावट सेलनोट तसेच बनावट कागदपत्रे तयार करून या मालमोटारी येथे नोंदणी करण्यात आल्या. नोंदणी झालेल्या काही मालमोटारी उपप्रादेशिक परिवहन विभागाची ‘एनओसी’ घेऊन औरंगाबाद, नाशिक प्रादेशिक कार्यालयात नोंदणीसाठी गेल्या आहेत, त्यातील काही मालमोटारींची तेथे नोंदणीही झाली आहे. शो रुममधून खरेच मालमोटारीची विक्री झाली किंवा नाही तसेच नोंदणीसाठी सादर केलेली कागदपत्रे खरी की खोटी याची सत्यता श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासली जात आहे. त्यासाठी खास अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्रीरामपूर येथे नोंदणी झाल्यानंतर महिनाभरातच त्या वाहनांची नोंदणी इतरत्र करण्यासाठी ‘एनओसी’ घेण्यासाठी आलेल्या या महाभागामुळे हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे यातील काही वाहनांची ‘एनओसी’ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली देखील. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली असून पोलीस निरीक्षक पवार हे प्राथमिक चौकशी करून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयातून अनेक ‘एनओसी’ नाशिक प्रादेशिक कार्यालयात नोंदणीसाठी गेल्या आहेत. आता जळगाव येथे नोंदणी झालेल्या वाहनांची कागदपत्रेही तपासली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
चोरीच्या १८ मालमोटारींची श्रीरामपुरात नोंदणी?
By admin | Updated: September 19, 2016 00:11 IST