पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने केल्यानंतर त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारादरम्यान या आरोपीची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीतून आरोपीला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. या आरोपीच्या पोटात पाणी झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे या आरोपीला पुढील उपचारासाठी ससून (पुणे) रुग्णालयात हलविण्यात आले.
न्यायालयीन कोठडीतील आरोपी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्याच्या इतर बराकींमध्ये असलेल्या पोलीस व न्यायालयीन कोठडीत असलेल्या इतर ४६ आरोपींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १५ आरोपींचे चाचणी अहवाल सकारात्मक आले.
पारनेर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपी एकाच वेळी मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळल्याने पारनेर पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपींना न्यायालयापुढे हजर करणे, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा आरोपींशी वारंवार संपर्क येतो. तसेच कोठडीबाहेर बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी आरोपींच्या जवळून संपर्कात असतात.