अहमदनगर : जिल्ह्यातील ७६४ ग्रामपंचायतींच्या ७ हजार १३४ जागांसाठी तब्बल १५ हजार अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व तहसील कार्यालयात झुंबड उडाली होती. अर्ज ऑफलाईन असल्याने प्रशासनाचाही ताण कमी झाला होता. गुरुवारी (दि. ३१) दाखल झालेल्या अर्जांची छाननी असून ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
जिल्ह्यातील ७६४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली होती. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह त्यांचे समर्थक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज ऑफलाईन असल्याने विनाअडथळा प्रक्रिया पार पडली. अर्ज दाखल केल्यानंतर बिनविरोधसाठी गावागावांमध्ये बैठकांना जोर आला आहे.
दरम्यान पद्मश्री पोपटराव पवार यांनीही हिवरेबाजारच्या निवडणुकीसाठी सातव्यांदा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे ग्रामपंचायतीच्या एका प्रभागात पाण्यासाठी मतदारांनी बहिष्कार घातला आहे. जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथे ८५ वर्षांच्या आजीबाईने अर्ज दाखल केला आहे.