अहमदनगर : जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल केलेल्या ७१० ग्रामपंचायत सदस्यांचे पद प्रशासनाने कायम ठेवले असून, वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या १ हजार ३७५ सदस्यांचा निकाल जिल्हा प्रशासनाने राखीव ठेवला आहे़ त्यामुळे निकाल राखीव ठेवलेल्या सदस्यांचा जीव टांगणीला लागला आहे़ गेल्या आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या़ जात वैधताप्रमाणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ५ सप्टेंबर होती़ दिलेल्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या २ हजार १४० ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या़ त्यावर सुनावणी घेण्यात आली़ सुनावणीला १ हजार ८७२ सदस्यांनी हजेरी लावली़ त्यापैकी ११९ सदस्यांनी वेळेत जात वैधताप्रमाणपत्र दाखल केले़ उशिराने मिळाले पण मुदतीत सादर करणाऱ्या सदस्यांची संख्या ५९१ आहे़ जात वैधताप्रमाणपत्र वेळेत दाखल करणाऱ्यांची संख्या ७४० आहे़ मुदतीत प्रमाणपत्र देणाऱ्या सदस्यांचा निकाल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असून, त्यांचे पद कायम ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे या सदस्यांचा जीव भांड्यात पडला़ परंतु, १ हजार ३७५ सदस्यांनी प्रशासनाला ठेंगा दाखवित प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचा निकाल प्रशासनाने राखीव ठेवला आहे़ न्यायालयाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे़ त्यामुळे वेळेत प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्यांचा निकाल राखीव ठेवल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
१४०० सदस्यांचा निकाल राखीव
By admin | Updated: August 17, 2016 00:48 IST