अहमदनगर : शिक्षक दिनी ५ सप्टेंबरला वितरीत करण्यात येणाऱ्या जिल्हा पुरस्कारासाठी शिक्षकांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे १४ शिक्षकांची नावे अंतिम मान्यतेसाठी विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. यंदापासून जिल्ह्यातून तीन केंद्रप्रमुखांना पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहेत.या पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून १०० गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. ही प्रश्नपत्रिका शिक्षकांनी भरून गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत जिल्हास्तरावर पाठविल्या होत्या. शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांनी पाठविलेल्या प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. निवड समितीत उपाध्यक्षा मोनिका राजळे आणि सर्व विषय समित्याचे सभापती आहे. (प्रतिनिधी)पुरस्कार प्राप्त शिक्षक भाऊसाहेब कासार (बहिरवाडी शाळा, अकोले), सुदाम दाते (जि.प. शाळा तरंगेवाडी, संगमनेर), बाबासाहेब महानुभव (करंजी शाळा, कोपरगाव), अरूण बनसोडे (नपावाडी शाळा, राहाता), चंदा गायकवाड (माळवाडगाव शाळा, श्रीरामपूर), मारूती आग्रे (चिखलठाण शाळा, राहुरी), अशोक झावरे (शिंगवेतुकाई शाळा, नेवासा), श्रीकांता शिंदे (वरूर शाळा, शेवगाव), संजीवनी दौडे (धायतडकवाडी शाळा, पाथर्डी), केशव हराळे (बसरवाडी शाळा, जामखेड), दत्तात्रय अटकरे (दिघी शाळा, कर्जत), शिवाजी कुलांगे (मुंगुसगाव शाळा, श्रीगोंदा), संतोष मगर (जांभुळवाडी शाळा, पारनेर), मीना जाधव (नेप्ती शाळा, नगर) यांचा समावेश आहे. केंद्रप्रमुख तुकाराम कातोरे (बुऱ्हाणनगर शाळा, नगर), वि.नी. कोल्हे (शिंगवे तुकाई, नेवासा) आणि राजेंद्र ढाकणे ( शेवगाव) यांचा समावेश आहेत.