श्रीगोंदा : तालुक्यातील ११६ गावे व महसुली वाड्यांपैकी ९५ गावे व महसुली वाड्यांमध्ये कोरोनाने एंट्री केली आहे. मात्र, अशा परिस्थितीत ११ गावे व १० महसुली वाड्यांनी कोरोनाला शिवेवर रोखण्याचे काम केले आहे. त्यामुळे ही गावे कोरोनामुक्त राहिली आहेत.
तालुक्यात २ हजार ४३४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी २ हजार ३६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये कोरोनाला घाबरून बळी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोरोना वेशीवर रोखलेली गावे व वाड्यांची नावे अशी : आधोरेवाडी, बांगर्डे, भिंगाण खुर्द, चवर सांगवी, कणसेवाडी, खांडगाव, कोसेगव्हाण, माठ, पिसोरे बु., शिरसगाव बोडखा, भापकरवाडी, चोरमलेवाडी, डोकेवाडी, डोमाळवाडी, गव्हाणेवाडी, लगडवाडी, मासाळवाडी, पार्वतीवाडी, शिपलकरवाडी, वेठेकरवाडी.
चौकट..
बागायती भागात कोरोना..
श्रीगोंदा तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केल्यास कुकडी, घोडच्या पट्ट्यातील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्या प्रमाणात जिरायती भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अल्प असल्याचे दिसून येते.
चौकट..
रणभूमीतील योद्धे जिंकले..
कोरोना हेल्थ केअर सेंटरमध्ये अनेक डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम केले. अशा परिस्थितीत त्यांनी स्वत:ची काळजी घेतली. त्यामुळे एक डाॅक्टर वगळता इतर कुणालाही कोरोनाची बाधा झाली नाही, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.