विचार कायमस्वरुपी राहू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 09:30 AM2019-03-04T09:30:51+5:302019-03-04T09:33:29+5:30

एका विशिष्ट क्षणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला दिलेले आटोपशीर शद्बरूप हे स्वयंपूर्ण असे विचार तयार करतात.

thoughts are not permanent | विचार कायमस्वरुपी राहू शकत नाही

विचार कायमस्वरुपी राहू शकत नाही

Next

एका विशिष्ट क्षणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला दिलेले आटोपशीर शद्बरूप हे स्वयंपूर्ण असे विचार तयार करतात. त्यातून अभंग, काव्य किंवा साहित्यातील विविध प्रकारात मोडणारे वाङ्मय तयार होते. नंतर तोच विचार कायमस्वरुपी राहील असेही सांगता येत नाही. तो विचार नंतरच्या काळात निष्प्रभही होऊ शकेल? कारण ज्यावेळी संसार दु:खाने पोळलेली अवस्था असेल त्यावेळी त्या मनाची स्थिती बिघडलेली असेल. संवेदनक्षम मनोभूमिकेत असणाऱ्या मनाची अवस्था त्या-त्या क्षणी सारखीच असू शकत नाही. विचारगर्भ किंवा भावनोत्कट मनाचे सहजोद्गार असतात. काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम, सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते. म्हणजे मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी आहेत. त्याचा आपण विचार करतो. मानवी जीवनाची कृतार्थता कोणत्या गोष्टीत आहे याचे विश्लेषण संतविचारांनी भारावलेले मनच करू शकते.

मनाच्या या विविध आविष्कारांमुळे त्याचा अधिकार समाजाच्या सर्व स्तरातून पाहायला मिळतो. प्रापंचिक दु:खांनी गांजलेले स्त्री-पुरुषाचे ‘मन’ नव्या आनंदमयी अशा वातावरणात रंगून जाते किंवा कधी कधी आत्मसात केलेल्या ज्ञानाचे प्रात्यक्षिकीकरण दाखवते. साऱ्यांच्या जीवनाचे प्रयोजन मनच करीत असते. जन्म-मरणाच्या फेºयातून निरंतराची मुक्तता अनुभवण्याची किमयाही मनाचीच असते किंवा भक्तिप्रेमाचा आनंद मिळविण्यासाठी आपल्याला पुन: पुन्हा हा जन्म मिळावा ही अपेक्षा करणारेही मनच होय. कारण ईश्वरकृपेचा अनुग्रह व्हावा ही अपेक्षा बाळगणारे मनच होय. यामुळे जीवनात सुख जवापाडे असले तरी दु:ख पर्वताएवढे असते याचाही अनुभव घेणारे मन. परमेश्वराने आपल्याला या दु:खमय संसारातून सोडवावे असे वाटणारेसुद्धा ‘मन’च होय. काही जणांच्या जीवनात वैफल्य येऊन या संसाराला कंटाळणारेही मनच असते. तर काही जणांना भावमनाने परमेश्वरापाशी पोहोचविणारे मनच असते. या संसारातील सुख-दु:खांच्या पाठीमागे मनच कार्यरत असते. त्यामुळे सर्व काही मनावरच अवलंबून आहे. मन आनंदी ठेवा. सर्वदूर आनंद मिळेल.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: thoughts are not permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.