शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

तेचि आदरे हरिकथा । ऐकीत जावी ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 18:54 IST

श्रवणाने विषयाचं विस्मरण तर होतंच पण मरणाला जिंकण्याची ताकद ही श्रवणांत आहे. श्रवण कायेनं, वाचेनं आणि मनानं करावं..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी, बीड, महाराष्ट्र.श्रवणाचा मुख्य हेतू हा आपल्या जीवनांत बदल घडावा, हाच असायला हवा म्हणून श्रवण करतांना आपण वक्त्याने सांगितलेले मुद्दे नीट समजून घेणे गरजेचे असते पण हल्ली हे न घडता, हेतू समजावून न घेता, वक्त्यांनी आमच्या भावना दुखावल्या या नावाखाली संघर्ष आणि भांडणं वाढली म्हणून पूर्वीच्या काळी गुरुकुलामध्ये विद्यार्थी कोरड्या समीधा आणीत. कोरड्या समीधा हे मन कोरं असल्याचं प्रतीक आहे तर ओल्या समीधा हे संशयी मनाचं प्रतीक आहे. कुठल्याही यज्ञांत ओल्या समीधांचा धूरंच होतो आणि श्रवण करणं हा तर ज्ञानयज्ञ आहे. या ज्ञानयज्ञांत कुठल्याही संशयाचा धूर निघता कामा नये. श्रवणासाठी वक्तासुद्धा तितकाच अधिकारी असावा लागतो. श्रोता आणि वक्ता यांच्यात एकता किंवा अभेद असावा. सांगणाराने सांगणाराला असं सांगावं की, श्रोत्याने सर्वस्व विसरावं. अर्जुन गीता कां जगला.? तर सांगणारा श्रीकृष्ण होता आणि ऐकणारा अर्जुन कृष्णमय झालेला होता, म्हणून सकळ इंद्रियांचे कान करुन श्रवण करा.

शांतिब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात -चुकलियां पुत्राचि वार्ता । जेणे आदरे ऐके माता ।तेचि आदरे हरिकथा । ऐकीत जावी ॥

ज्याप्रमाणे अनेक वर्षें झाली मूल हरवलेले आहे आणि त्या मुलाला कोणीतरी बघितले आहे याबद्दलची काही वार्ता कानावर पडताच त्या मुलाची आई ज्या आतुरतेने ती वार्ता ऐकू लागते त्याच आतुरतेने हरिकथा श्रवण करावी. श्रवण कायेनं, वाचेनं, मनानं करावं जसं राजा परीक्षितीने केलं. सात दिवसांवर मृत्यू येऊन ठेपलेला असताना त्याने असं ऐकलं, असं ऐकलं की मृत्यूवरही जय मिळविला म्हणजे यामुळे तो मरणाला सुद्धा हसत हसत सामोरा गेला. श्रवणाने विषयाचं विस्मरण तर होतंच पण मरणाला जिंकण्याची ताकद ही श्रवणांत आहे म्हणून वामनपंडित म्हणतात -

तो मोक्षही मज नको श्रुतिसार साचा ।जेथे रस नसे तुझ्या पदसार साचा ॥तुझे सदुक्त चरणामृत देवराया ।ऐकेन अयुतकर्ण दे देवराया ॥

हजारो कानांनी काय ऐकावं किंवा आजच्या भाषेत काय वाचावं.? तर ज्या ऐकण्यानं किंवा वाचनानं आपले अवगुण जातील, आपल्या मनांत सद्विचारांची वाढ होईल, द्वेष, मत्सर निघून जाईल असं संतसाहित्य, वीर पुरुषांची चरित्रं, बोधकथा  थोडक्यात संसारमुक्त करणारे साहित्य वाचावे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

जेणे होय उपरति । अवगुण पालटती ।जेणे चुके अधोगती । या नांव ग्रंथ ॥

आज लोक म्हणतात, आम्ही खूप ऐकलंय किंवा वाचलंय पण ऐकण्यानं किंवा वाचण्यानं काही फरकच पडला नसेल तर काय ऐकलं आणि काय वाचलं.? श्रवण हे रोज करायला हवं तरच आपल्याला त्या गोष्टीतील मर्म समजतं. थोर भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टांइनच्या जीवनातील एक प्रसंग..! आईनस्टांइन आपल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला सुस्पष्टता येण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्याने देत असत. एकदा अशाच एका महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी जेव्हा त्यांचा चालक गाडी घेऊन आला तेव्हा ते त्याला म्हणाले, आज माझं डोकं खूप दुखतंय, आपण आजचं व्याख्यान रद्द करुया. तेव्हा त्यांचा ड्राईव्हर म्हणाला, काळजी करुं नका सर.. आज आपण अगदी नवीन ठिकाणी जात आहोत. तिथे तुम्हाला कोणीही ओळखत नाही तुम्ही नुसतं बसून रहा तुमच्यावरचं भाषण मी करतो, मला सगळं पाठ आहे. दोघंजण महाविद्यालयमध्ये गेले. १० मिनिटे ड्राईव्हरने सुंदर भाषण केलं. सगळ्यांना खूप आवडलं पण एका प्राध्यापकाने एक शंका विचारली. ड्राईव्हर तसा हुशार होता. तो म्हणाला की, हा प्रश्न इतका सोपा आहे की, याचं उत्तर तर माझा ड्राईव्हरही देईल. आईनस्टांइन उत्तर दिलं. इथे सांगण्याचा मुद्दा इतकाच की, सततच्या श्रवणाने माणसामध्ये निश्चित परिवर्तन होतं. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नका. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

श्रवणामध्ये सार श्रवण । ते हे अध्यात्मनिरुपण ।सूचित करुनी अंतःकरण । ग्रंथामध्ये विवरावे ॥

आपल्याकडे अनेक ग्रंथांची पारायणे केली जातात पण पारायणं करणं म्हणजे नुसता ग्रंथ वाचून संपवणं नव्हे तर त्यात जे काही सांगितलं आहे ते तत्त्व समजेपर्यंत तो ग्रंथ ऐका किंवा वाचा. श्रवण हे व्यसन झालं पाहिजे. श्रवणाचा ध्यास लागला की मग मात्र आपली अवस्था अशी होते की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

तिमिर दुःख गेले । फिटले भ्रांतीचे पडळ ॥श्रीगुरु निवृत्तीराय । कृपा केली निर्मळ ॥

श्रवणाने एकदा त्यातील सार सापडलं की, अज्ञानाचं दुःख जातं, मनाची चंचलता दूर होते आणि ज्या परमशक्तीमुळे माझ्यामध्ये चैतन्य आलं त्या शक्तीची, त्या परमेश्वराची ओळख आपल्याला होते. ज्या तत्वातून आपण जन्माला आलो तिकडे जाण्याची ओढ लागते आणि हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे, हे लक्षांत येते.

दोन मिठाच्या बाहुल्या होत्या. एकदिवस त्या समुद्रकिनारी आल्या. एक दुसरीला म्हणाली, समुद्राची खोली किती असेल गं.? दुसरी म्हणाली, अगं इथे उभा राहून कशी कळणार.? थांब.! मी बघून येते आणि असं म्हणून तिने समुद्रात उडी मारली ती आजतागायत परत आली नाही. कां.? कारण ती मिठाची बाहुली होती. जी सागरापासून निर्माण झाली आणि सागरांत मिसळून गेली. संत म्हणतात -

थेंबुटा सागरी मिळाला । तो सागरचि जाहला ॥

पावसाचा थेंब सागरांत पडल्यावर ज्याप्रमाणे त्याचा सागरंच होतो त्याप्रमाणे आपण काही गमावले अशी कुठलीही भावना  न वाटता परमेश्वराच्या ऐक्याची प्रचिती यावी असं वाटत असेल तर श्रवण हा अध्यात्माचा पाया आहे, हे आधी लक्षांत  घ्यायला हवं..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक