सेवेमुळे जीवनात परिपूर्णता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 02:31 PM2019-01-15T14:31:30+5:302019-01-15T14:32:03+5:30

सेवेच्या चार प्रमुख पायऱ्या आहेत. पहिली पायरी स्वत: अथवा स्वत:च्या शरीराची आहे. म्हणून सर्वप्रथम स्वत:च्या शरीराची निगा राखायची आहे, कारण ...

Service made life complet | सेवेमुळे जीवनात परिपूर्णता!

सेवेमुळे जीवनात परिपूर्णता!

googlenewsNext

सेवेच्या चार प्रमुख पायऱ्या आहेत. पहिली पायरी स्वत: अथवा स्वत:च्या शरीराची आहे. म्हणून सर्वप्रथम स्वत:च्या शरीराची निगा राखायची आहे, कारण या जगात आपण आहे तर इतर सर्व आहे. आपण आहोत, तर आपले कुटुंब, आपला समाज व जग आहे. तेव्हा त्यासाठी देवाप्रमाणे सेवा करून त्याला निरोगी राखायचे आहे आणि कुठल्याही व्यसनापासून दूर ठेवायचे आहे.  आपल्या या शरीरात तो ईश्वराचा वास आहे, असे समजून त्याची सेवा केली पाहिजे.

माणसाच्या सेवेची दुसरी पायरी म्हणजे त्याचे कुटुंब. आपल्याला या जगात रहायचे तर कुटुंबाबरोबरच रहावे लागते. म्हणजे आपले अस्तित्व आपल्या कुटुंबावरच अवलंबून असते. आपल्या कुटुंबाचे संस्कार आपल्यावर येत असतात. त्यासाठी त्याचा उद्धार करायचा असतो. त्याला सुसंस्कृत करण्यास हातभार लावायचा असतो. त्यासाठी प्रेमाने कुटुंबातील प्रत्येकाची सेवा करायची असते. 

माणसाच्या सेवेची तिसरी पायरी म्हणजे मनुष्य समाज आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. इतर माणसांशिवाय त्याचे अस्तित्व नगण्य आहे. माणूस इतर माणसांशी प्रेम, स्नेह व देवाणघेवाणीच्या व्यवहारात आपुलकी असते. सभोवतालचा मनुष्य समाजाची छाप आपल्यावर पडतो व त्याप्रमाणे आपल्याला काही प्रमाणात तरी त्यांचे वळण लागते. म्हणून आपला व आपल्या कुटुंबाचा आर्थिक व सांस्कृतिक उद्धार सभोवतालच्या मानव समाजावर अवलंबून आहे. त्यासाठी आपले कुटुंब व स्वत:च्या उद्धारासाठी मनुष्यसमाजाची सेवा तेवढीच महत्त्वाची आहे.

माणसाच्या सेवेची आणखी एक महत्त्वाची व चौथी पायरी म्हणजे प्राणी व वनस्पतीची सेवा होय. ही निसर्गसेवाही आहे. ही सेवा विशेष महत्त्वाची आहे. आपले अस्तित्व त्याच्यावरच अवलंबून आहे. त्याच्या शिवाय क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. आपला श्वास घेणारा प्राणवायू व जेवणखाण त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे वनस्पती व प्राण्याशिवाय आपले जीवन ही कल्पनाच आपण करू शकणार नाही. म्हणून या सेवेशिवाय आपली सेवा पूर्णत्वाला पोचणार नाही.

सेवा करण्याचे महत्त्व आपल्याकडे फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. शंकराचे दोन पुत्र श्री कार्तिकेय व श्रीगणेश. त्यात कार्तिकेय बलवान व धाडसी, तर श्रीगणेश बलवान व आईवडिलांची सेवा करणारा होता. या सेवेमुळेच श्रीगणेशाने आईवडिलांची मने जिंकली व प्रत्येक ठिकाणी विजयी झाला. तसेच रामायणात श्रावण बाळाने आईवडिलांच्या सेवेत प्राणत्याग केल्यामुळे आजपर्यंत सर्वांची मने जिंकली. नंतर हनुमंताने श्रीरामाची सेवा नि:स्वार्थपणे केल्याने ती एक शक्तीमान व नवसाला पावणारी व माणसाच्या मनात घर करून बसलेली व अग्रस्थान प्राप्त झालेली देवता समजली जाते, तसेच महाभारतात अजुर्नाने श्रीकृष्णाची अग्रक्रमाने सेवा केल्यामुळे तो कीर्तीमान व अंतिम ध्येयाकडे पोचलेला महापुरुष ठरला. जगातील सर्वांत मोठा ख्रिस्ती धर्म संस्थापक येशू ख्रिस्ताची त्यांच्या शिष्यांनी मन:पूर्वक सेवा केल्याने ते तो धर्म स्थापू शकले व त्याचा त्यावेळी प्रसारमाध्यम नसताना जगभर प्रसार केला. हा सर्व सेवेचा चमत्कार आहे. त्याने उच्च मनोबल प्राप्त होते व अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते.

 मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास्त चांगले पुस्तक कोठे असू शकते? असे महात्मा गांधी म्हणाले होते खरी समस्या ही आहे की वास्तविक ‘शिक्षण’ म्हणजे काय लोकांना ह्याची कल्पना नाही.  जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते. मात्र शिकलेल्यांच्या चरित्राचा विकास घडविण्याकडे आपण फारच थोडे लक्ष देतो. त्यामुळे सेवा दुर्लक्षीत होत आहे. 

शैक्षणिक ध्येयधोरणांत आणि निर्णयप्रक्रियेत सेवेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायºया आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी, वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत. जरी अभ्यासक्रम एकच असेल तरीही शाळा, शिक्षक, शहर वा खेडे तसेच इतर अनेक घटक यामुळे शिक्षणासोबतच सेवेचाही दर्जा बदलतो. त्यात एकवाक्यता, सुसूत्रता येत नाही.  त्यामुळे सेवा ही आणखी दुर्लक्षीत होत जाते. 

सेवेची महती पटविण्यासाठी संस्काराची जोड आवश्यक आहे. माणसावरील संस्कारांना सूक्ष्म मानसिक परिमाण लाभते. शारीरिक व्यायाम, कसरत इत्यादींद्वारा शरीरसौष्ठव, वस्त्र व अलंकारांनी सभ्यता आणि सौंदर्य जोपासले जाते. वासना, प्रवृत्ती, नैसर्गिक आवड-निवड यांना भाषा-साहित्य, कला, कायदा, नीती, धर्म इ. संस्कारांद्वारा  चांगले वळण  लावले जाते; माणसात सदविचाराची रूची निर्माण केली जाते; विवेकजागृती केली जाते. अशा तºहेने संस्कृती व सभ्यतेच्या विविध अंगांशी निगडित विविध प्रकारचे संस्कार असतात. संस्कार आणि संस्कृती या दोन संकल्पना समकक्ष आहेत. संस्कारांमध्ये धार्मिक संस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. तितकेच महत्व मानवी जीवनात सेवेलाही आहे. सेवेमुळे मानवी जीवनात परिपूर्णता येते.

- शुभांगी नेमाने

शिर्ला नेमाने, ता. खामगाव.

Web Title: Service made life complet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.