अति आदरे सज्जनांचा करावा..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:24 PM2020-05-09T17:24:33+5:302020-05-09T17:25:01+5:30

ज्याच्या मनांत कधीही भेदभाव नसतो, जो कधीही खोटं बोलत नाही, जो निरंतर आपलं कल्याणंच इच्छितो तो आप्त..!

Respect to the gentlemen ..! | अति आदरे सज्जनांचा करावा..! 

अति आदरे सज्जनांचा करावा..! 

Next

- ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

मागील लेखात आपण पाहिले की, श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, हे मना.! तू सर्वसंगत्याग कर पण पुढे श्रीसमर्थ एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात कारण श्रीसमर्थांना माहित आहे की, आजच्या बुद्धिवादी जगांत सर्व संग सोडणं कसं शक्य आहे? हा प्रश्न उपस्थित होतो म्हणून ते पुढील अर्धचरणांत म्हणतात -

अति आदरे सज्जनांचा करावा।

आता सज्जन म्हणजे कोण..? तर साधू, संत यांची संगती ही सज्जनांची संगती. शांतीसागर एकनाथ महाराज म्हणतात -

संसार करावया जाण । सत्संगतीच प्रमाण ।
त्याचे भावे धरिल्या चरण । दिनोद्धरण त्यांचेनि ॥

किंवा तुकोबा म्हणतात -

याजसाठी संतपाय हे सेवावे । तरीच तरावे तुका म्हणे ॥

याठिकाणी वरील दोन्ही प्रमाणांवरुन आपल्या हे लक्षात येतं की, संतसंगतीशिवाय माणसाला आयुष्यात काहीच चांगलं मिळविता येत नाही म्हणून ठामपणे संत सांगतात की,
संतपाय हे सेवावे किंवा धरिल्या चरण

आता संतांचेच चरण का धरायचे..? कारण संत हे 'आप्त' आहेत. आता 'आप्त' म्हणजे कोण..? तर - 

आप्तस्तु यथार्थ वक्ता ।

ज्याच्या मनांत कधीही भेदभाव नसतो, जो कधीही खोटं बोलत नाही, जो निरंतर आपलं कल्याणंच इच्छितो तो आप्त..! हल्ली आपण सोयरा असेल तर त्याला आप्त म्हणतो पण लक्षांत घ्या, सोयरा हा कधीही आप्त नसतो. आप्त फक्त संतच असू शकतात म्हणून संतचरण धरा. आता चरणंच का..? तर त्यांचं आचरण चांगलं म्हणून त्यांचे चरण चांगले आणि दुसरा मुद्दा याठिकाणी नम्रता किंवा संपूर्ण शरणागतीची संकल्पना आहे.

संतसंगती ही एक प्रकारची ठिणगी (Spark) आहे. ज्याप्रमाणे विजेच्या तारेला स्पर्श होताच जसा शाॅक हा बसतोच तसा संतसंगतीत गेला की मनुष्य हा बदलतोच त्यामुळे संतसंगती ही परिवर्तनाची ठिणगी आहे. संतसंगतीने माणसाच्या मनांत पश्चात्तापाची भट्टी पेटली जाते ज्यातून माणूस हा तावूनसुलाखूनच बाहेर पडतो. जे महर्षि वाल्मिकींच्या बाबतीत घडलं. वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा आपण सर्वजण जाणतो म्हणून नारदमहर्षि आपल्या भक्तीसूत्रामध्ये सत्संगतीचे तीन पैलू सांगतात -

सत्संगः तु दुर्लभः दुर्गमः अमोघश्च ।

सत्संग हा एक तर दुर्लभ असतो. तो होतच नाही. संत मिळाले तरी त्यांना ओळखता येत नाही. संत मिळाले आणि ओळखता आले की त्यानंतर मात्र त्याचा जीवनामध्ये होणारा परिणाम अमोघ म्हणजे निश्चित स्वरुपाचा असतो.

संतांचा स्पर्श जीवनातील पापांचा नाश करतो.

श्रीमद् भागवतामध्ये एक कथा आहे. भगवती गंगामातेने स्वर्गातून भूमंडलावर येताना भगीरथाला दोन प्रश्न विचारले होते. " भगीरथा, माझा वेग अत्यंत अधिक असेल तेव्हा मला कोण धारण करेल.? " भगीरथ म्हणाले, " आई, भगवान महादेव तुला धारण करतील. " भगवती गंगेने आणखी एक प्रश्न विचारला, " भगीरथा, मी या भूमंडलावरती येईन. दूरदूरचे लोक येऊन माझ्यामध्ये स्नान करतील आणि माझ्यामध्ये स्नान केल्यानंतर त्यांची पातके मला धुवावी लागतील. त्यांची पातकं तर नष्ट होतील पण ती पातकं माझ्यात साठतील. त्या पापांचा नाश कोण करणार.? " आणि भगीरथांनी उत्तर दिले,
" आई, ज्याप्रमाणे सामान्य भाविक लोक येऊन तुझ्यामध्ये स्नान करतील त्याप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ संत महात्मेही येऊन तुझ्या प्रवाहामध्ये स्नान करतील आणि ज्याक्षणी संतांचा स्पर्श तुझ्या प्रवाहाला होईल त्याक्षणी तुझ्यामध्ये साठलेले हे संपूर्ण पातक जळून नष्ट होईल. "

जगातील पातक धुण्याचे काम गंगामाता करते, पण गंगामातेमध्ये साठलेल्या पातकांना नष्ट करण्याचे काम संतांच्यामुळे होते आणि म्हणून संतांच्या जीवनात तीन गोष्टी आपणांस साकारलेल्या दिसतात.
एक संस्कृत सुभाषित आहे -

गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा ।
पापं तापं च दैन्यं च घ्नन्ति सन्तो महायशाः ॥

गंगामाता केवळ पाप नष्ट करते, चंद्र केवळ ताप नष्ट करतो आणि कल्पवृक्ष दारिद्र्य नष्ट करतो पण संत हे आपल्या जीवनातील पाप, ताप आणि दैन्य या तीनही गोष्टी नष्ट करतात..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

Web Title: Respect to the gentlemen ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.