जीवनातील सावधानता———विलास गरवारे——-प्रपंचावरील माया भगवंताला अर्पण केल्यावर भगवंत भेटतोच. श्रीसमर्थांनी सावधान शब्दाचा अर्थ ओळखला होता. सा म्हणजे साधूता, व म्हणजे वर्तमानकाळाचा वेध घेण्याची शक्ती, धा म्हणजे धारणा पक्क्या होणे आणि न म्हणजे नम्रता. सावधान म्हणजे नेमके काय ? हे लक्षात घेता आपल्या सर्वांना सावध करण्याचे कार्य श्रीसमर्थ करतात, याची जाणिव होते.स्वत: प्रपंच न करता श्रीसमर्थांनी आधी प्रपंच करावा नेटका हे सांगितले. श्रीसमर्थांसह कोणत्याही संतांनी प्रपंच सोडा, असे सांगितले नाही. प्रपंच नेटका केल्यानंतर मन प्रपंचामधून निघण्यासाठी त्यास मना सज्जना भक्तिपंथेचि जावे, असे श्रीसमर्थ सांगतात. प्रपंच करून परमार्थ करताना कर्तेपणा श्रीरामाला द्यावा. तोच सर्व भार वाहतो, या श्रध्देने प्रपंच केल्यास परमार्थ सहज प्राप्त होतो. संत गोरोबा कुंभार यांनी प्रपंचातील दु:खाचा सर्व भार पांडुरंगावर सोपवला. त्या दृढ निष्ठेमुळे भगवंत स्वत: गोरोबाकाकांचे घरी दास म्हणून राहिले. आपले मन प्रपंचामधून निघत नाही म्हणून परमेश्वरचरणी लीन होत नाही. मनाला एकदा भगवंताच्या नामाचा अनुभव आला की ते बदलत नाही. त्यासाठी सतत नामचिंतन करण्याचा संदेश ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिला आहेच. भजनात आणि नामात समाधानच मिळते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवंताने ठेवले तसेच रहावे. चित्ती असू द्यावे समाधान असे सांगितले आहे. रवीला दोरी लावून ताक घुसळण्याच्या काळात गृहिणी आरोग्यदृष्ट्या तंदुरूस्त असायच्या. आता झटपट आवरण्यासाठी मिक्सर आला. कामे लवकर आटोपत असली तरी खास वेळ काढून व्यायाम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. श्रीसमर्थांसारखे सद्गुरू मिळणे व त्यांची कृपा लाभणे हे फार भाग्याचे.
जीवनातील सावधानता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:07 IST